महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाची गाडी रुळावर आणनाऱ्या मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी पुणे येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर बदली झाल्याचा आदेश आज दुपारी येऊन धडकला दरम्यान, वर्तमानस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष पाहता आयुक्त द्विवेदी यांची बदली झाल्याने महापालिकेची प्रशासकीय घडी पूर्णत: विस्कटण्याची चिन्हं आहेत.
राज्य शासनाने सप्टेंबर २०२० मध्ये मनपाच्या आयुक्तपदी आयएएस निमा अराेरा यांची नियुक्ती केली होती. अवघ्या वर्षभराच्या आत शासनाने निमा अराेरा यांची पदाेन्नतीद्वारे जिल्हाधिकारी पदावर बदली केली. सप्टेंबर २०२१ मध्ये कविता द्विवेदी यांनी आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली. मनपाच्या इतिहासात प्रथमच दाेन आयएएस महिला अधिकारी लाभल्याचा याेग जूळून आला हाेता.
यादरम्यान, ४ मार्च २०२२ राेजी मनपा सदस्यांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे शासनाने द्विवेदी यांची प्रशासकपदी नियुक्ती केली. तेव्हापासून द्विवेदी मनपाचा एकहाती कारभार सांभाळत आहेत. याकालावधीत एक उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त व इतर सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कारभार हाकताना द्विवेदी यांची दमछाक झाल्याचे चित्र आहे. मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन नियमीत व वेळेच्या आत अदा करण्याच्या आयुक्तांच्या भूमिकेमुळे कर्मचारी सुखावले आहेत. मागील काही दिवसांपासून आयुक्त द्विवेदी बदलीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. मात्र आज दुपारच्या सुमारार पुणे येथे बदली झाल्याचा आदेश अकोला महानगर पालिकेत येऊन धडकला त्यांची बदली झाल्याने आता त्यांच्या जागेवर कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.