अकोला न्यूज नेटवर्क डेस्क :- दि. 18 : लोकशाही प्रक्रिया व मतदानाबाबत जाणीवजागृती करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांत ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’ स्थापण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व शाळांनी प्रयत्न करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांनी आज येथे केले.
अकोला पश्चिम मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातर्फे नियोजनभवनात आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. सहायक मतदार नोंदणी अधिकारी सुनील पाटील, नायब तहसीलदार गणेश वाठुरकर यांच्यासह मतदारसंघातील बीएलओ, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते.
श्रीमती भालेराव म्हणाल्या की, भावी मतदार असलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’द्वारे तो शिकवला जाईल. निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाचे महत्व जनमानसात रूजविणे आवश्यक आहे. त्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. श्री. पाटील, श्री. वाठुरकर, किशोर चतरकर, अमित उके यांनी मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तराच्या तासात श्री. उके यांनी सर्वांचे शंकानिरसन केले. दिनेश सोनोने यांनी प्रास्ताविक केले.