अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ :-अकोल्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये गुरे चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यामध्ये बादलापूर येथून बैल जोडी चोरून नेल्याची घटना ताजी असतांनाच कंचनपूर येथून एकाच रात्रीतून 2 बैलजोडी अशी 4 गुरे चोरट्यांनी दिनांक 28 च्या मध्यरात्री चोरून नेली…या ठाण्याच्या हद्दीमध्ये गुरे चोरीचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
कंचनपूर येथे बळीराम चोरे तसेच सारंगधर चोरे यांचे गावातच शेती अवजारे ठेवण्यासाठी व गुरे बांधण्यासाठी गोठा आहे. या गोठ्यात यांच्या मालकीचे गाय,वासरू,गोरे,बैलजोडी अशी जनावरे बांधलेली होती.शनिवार दिनांक 28 तारखेला रात्री साडेअकराला बळीराम चोरे हे गुरांना चारापाणी करून घरी गेले.मात्र रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी पहाटे बळीराम चोरे हे गुरांना चारापाणी करण्यासाठी गेले असता त्यांना 4 बैल म्हणजे दोन बैलजोड्या दिसून आल्या नाहीत.
कंचनपूर येथील गोठ्यातून सुमारे 80 ते 90 हजार रुपये किंमतीचे पांढऱ्या रंगाच्या दोन बैलजोड्या अश्या सुमारे 2 लाख रुपये किंमतीचे चार जनावरे चोरट्यांनी चोरून नेले.या प्रकरणी बळीराम चोरे तसेच सारंगधर चोरे यांनी उरळ पोलिसात या प्रकरणी माहिती दिली असून अज्ञात चोरट्यानं विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
कंचनपूर परिसरातील आसपासच्या गावांमध्ये गुरे चोरून नेण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे…10 ते 15 दिवसांमध्ये अनेक गुरे चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. कंचनपूर पासून जवळच असलेल्या बादलापूर येथून बैलजोडी चोरीस गेल्याची घटना घडली होती. ही जनावरे गोठ्यातूनच गेली…तोच शनिवार दिनांक 28 तारखेला कंचनपूर येथून पशुधन चोरीस गेले आहे… पोलीसात दाखल झालेल्या पशुधनाची किंमत कमी असली तरी प्रत्यक्षात मात्र लाखो रुपयांचे वरती हे पशुधन चोरीस गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे…