Friday, July 19, 2024
Homeक्रिडा विश्वराष्ट्रगीतावेळी हार्दिक पंड्याच्या डोळ्यात तरळले अश्रू, कर्णधाराने 140 कोटी भारतीयांनाही केलं भावूक

राष्ट्रगीतावेळी हार्दिक पंड्याच्या डोळ्यात तरळले अश्रू, कर्णधाराने 140 कोटी भारतीयांनाही केलं भावूक

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ० ४ऑगस्ट २०२३ :-भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी आणि वनडेनंतर आता 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) ब्रायन लारा स्टेडिअम येथे पार पडला. या सामन्याची नाणेफेक विंडीजचा कर्णधार रोवमन पॉवेल याने जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रगीतावेळी हार्दिक पंड्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचा कर्णधार भावूक झाल्याचे फोटो आता सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.खरं तर, टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) संपल्यानंतर भारतीय टी20 संघाच्या नेतृत्वाची धुरा हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या खांद्यावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी मैदानावर उतरताच पंड्याच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. आता त्याचे यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सन 2024मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धा लक्षात घेता भारतीय संघासाठी ही मालिका खूपच महत्त्वाची मानली जात आहे.

भारताचा पराभव
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाला निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 149 धावाच करता आल्या होत्या. यावेळी भारताकडून दोन गोलंदाज चमकले होते. त्यात अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांचा समावेश आहे. या दोघांनीही प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या होत्या. तसेच, कर्णधार हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

विंडीजच्या 150 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या नाकी नऊ आल्या. वरची फळी सपशेल फ्लॉप ठरली. ईशान किशन आणि शुबमन गिल अनुक्रमे 6 आणि 3 धावांवर बाद झाले. त्यानंतर वनडेत फ्लॉप ठरलेल्या सूर्यकुमार यादवकडून या सामन्यात अपेक्षा होती. त्याने 21 चेंडू खेळून फक्त 21 धावाच केल्या. मात्र, आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या तिलक वर्मा (Tilak Varma) याने शानदार फलंदाजी करत 22 चेंडूत सर्वाधिक 39 धावा केल्या. यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या 19, अक्षर पटेल 13, संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंग प्रत्येकी 12 धावा करून बाद झाले. स्टार खेळाडू या सामन्यात खास कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे भारतीय संघ 20 षटकात 9 विकेट्स गमावत 145 धावाच करू शकला. अशात वेस्ट इंडिजला 4 धावांनी नजीकचा विजय मिळवण्यात यश आले. यजमान संघ मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे.

पंड्याच्या नेतृत्वाखाली वनडे मालिकेत विजय
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या 2 सामन्यात हार्दिक पंड्या याने भारताचे नेतृत्व केले होते. यातील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच, तिसऱ्या सामन्यात भारताने 200 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकत मालिका 2-1ने आपल्या खिशात घातली होती. यावेळी पंड्याच्या बॅटमधून शानदार अर्धशतकी खेळीही पाहायला मिळाली होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp