अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १९ जानेवारी २०२४:- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता राजकीय मैदानात उतरलं पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. “जरांगे पाटलांचा गरीब मराठ्यांच्या रस्त्यावरचा आवाज येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेतही गेला पाहिजे. कायदेशीर लढा उभा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भूमिका घेतली पाहिजे,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.गेल्या ३५ वर्षांपासून गरीब मराठ्यांचा लढा हा सुरू आहे. मात्र श्रीमंत मराठे हा लढा उभा राहू देत नव्हते. परंतु जरांगे पाटलांच्या निमित्ताने त्याला स्वरूप आणि आकार मिळाला. जरांगे पाटलांनी कुणालाही राजकीय पाठिंबा न देता येणाऱ्या निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी. जरांगे पाटलांच्या पाठीशी गरीब मराठ्यांनी पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे. मुंबई येथे जे आंदोलन होणार आहे तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे,” अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
सरकारवर हल्लाबोल करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत आमदार बच्चू कडू यांच्याकडून जरांगे पाटलांसोबत सुरू असलेली बोलणी अयशस्वी झाल्याची आमची माहिती आहे. जरांगे पाटील यांच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचं नेतृत्व उभं राहिले आहे. त्यामुळे श्रीमंत मराठे हादरले आहेत. शासनावरही दबाव टाकला जात असल्याची परिस्थिती आहे. मात्र सरकारकडून जरांगे पाटील यांना खेळवत ठेवले जात आहे. लोकसभा निवडणुका आल्याने सरकारचा हात दगडाखाली आहे,” असं ते म्हणाले.ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हे वेगळं असावं ही आमची भूमिका आहे. मराठ्यांसाठी आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण केलं पाहिजे,” अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या आवाहनाला आता मनोज जरांगे पाटील कशा प्रकारे प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.(AKOLA ANN NEWS NETWORK)