अकोला न्युज नेटवर्क दिनांक २७ जुलै २०२३ :- अमरावती जिल्ह्यातील माेर्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर असलेल्या गिता ठाकरे यांची अकाेला महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील आदेश मंगळवारी नगर विकास विभागाने जारी केला आहे. दरम्यान, मागील वर्षभराच्या कालावधीत मनपात अतिरिक्त आयुक्त पदासह मुख्य लेखा परीक्षक, उपायुक्त तसेच सहाय्यक आयुक्तपदासाठी शासनाने नियुक्ती आदेश जारी करुनही संबंधित अधिकाऱ्यांनी मनपाकडे पाठ फिरवल्यामुळे गिता ठाकरे यांच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील प्रलंबित विकास कामे, अनेक याेजना व माेठे प्रकल्प निकाली काढण्यासाठी महापालिकेला सक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. मनपातील रिक्त पदांचा अनुशेष दुर हाेत नसल्यामुळे थातूरमातूरपणे विकास कामे मार्गी लावली जात आहेत. संबंधित कामांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ‘वाॅच’राहत नसल्यामुळे अतांत्रिक संवर्गातील स्थानिक कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावते. वर्तमानस्थितीत मनपाचे प्रशासकीय कामकाज पूर्णत: विस्कळीत झाले आहे. शासनाने नियुक्ती आदेश जारी केल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी मनपात नियुक्त हाेत नसल्याची विचित्र परिस्थिती आहे. दरम्यान, तत्कालीन उपायुक्तांचा पुर्वानुभव लक्षात घेता गिता ठाकरे यांच्या नियुक्तीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अकाेट नगर परिषदेत गाजवला कार्यकाळ सन २००९च्या कालावधीत गिता ठाकरे अकाेट नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर कार्यरत हाेत्या. त्यावेळी त्यांनी अकाेटमधील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवर थाटलेले अतिक्रमण हटविण्याची माेहीम छेडली हाेती. दरम्यान, २०१८ मध्येही त्या अकाेट नगर परिषदेत नियुक्त असताना प्रशासकीय कामकाजात त्यांनी अनेकांचे पितळ उघडे पाडले हाेते,हे येथे उल्लेखनीय.