अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १९ जुलै :- राज्य शासनाच्या वतीने एसटी महामंडळामध्ये विविध योजनांची घोषणा करण्यात आली. या योजना एसटी महामंडळासाठी उत्पन्न वाढीच्या ठरत आहेत. महिलांसाठी प्रवास भाड्यात निम्मे सवलत योजनेचा मागील चार महिन्यात ३९ लाख महिलांनी लाभ घेतला. या सेवेतून विभागाला १३ कोटी १८ लाखांवर उत्पन्न प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे.
यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. एसटी महामंडळाच्या नियमित एकूण प्रवासी संख्येत ३० ते ३५ टक्के महिला प्रवाशांचा समावेश असतो. ग्रामीण भागातील महिलांसाठी योजना संजीवनी ठरली आहे. तसेच विद्यार्थिनी, नोकरीसाठी शहरात येणाऱ्या महिलांच्या खर्चात निम्म्याने घट झाली. यामुळे शहरामध्ये कामाला येणाऱ्या महिलांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अकोला विभागात एकूण ९ आगार आहेत. अकोला अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोला २, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर आगारातून योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठ्या आहे. सोबत वाशिम, मंगरूळपीर, रिसोड, कारंज या जिल्ह्याबाहेरील आगाराचेही उत्पन्न चांगले आहे. जून महिन्यात कारंजा १५१४२७, मंगरूळपीर १४५८८३, वाशिम १२०२८०, रिसोड १०२८४२ संख्येत महिलांनी प्रवास केला.