अकोला न्युज नेटवर्क दिनांक २५ जुलै :- जैन समाजाचे धर्मगुरू आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी मुनिराज यांच्या निर्मम हत्येच्या निषेधार्थ व आरोपीस योग्य शिक्षा व्हावी या करिता काल मूर्तिजापूर येथे मुक मोर्चा काढण्यात आला असून काळ्याफिती लावून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले.
कर्नाटकमधील चिककोही जिल्ह्यातील हिरेकुंडी गावात पर्वतावर विराजमान आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी मुनिराज यांच्या निर्मम हत्येच्या निषेधार्थ व आरोपीस योग्य शिक्षा व्हावी या व इतर मागणीच्या अनुषंगाने येथील सकल जैन समाज बांधवांनी शेकडोच्या संख्येत काळ्या फिती लावून निषेध मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी अपार यांना निवेदन दिले. तसेच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जैन धर्मीय दिगंबर साधूंबद्दल माध्यमांसमोर आक्षेपार्ह विधान केल्याने समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करीत एक निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये साधू-संतांवर होणाऱ्या आघाताने समाजाची चिंता वाढली असून, साधू, संत व समाजाला सुरक्षा प्रदान करावी. विहाररत साधूंच्या सुरक्षिततेसाठी हायवेवर ५ कि.मी. जैन समाजासाठी वक्फ बोर्ड गठीत करणे तसेच दिगंबर जैन साधूंवर केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल माध्यमांसमोर जाहीर माफी मागावी, अशा विविध मागण्या नमूद केल्या आहेत.