अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २९ जुलै २०२३:-मोहरम निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चौघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत नऊ जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरावर शोकाकळा पसरली आहे.रांची: झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात शनिवारी सकाळी मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. हायटेंशन वायरच्या संपर्कात आल्यानं १३ जण होरपळले. यातील चौघांचा मृत्यू झाला असून अन्य ९ जणांची प्रकृती गंभीर आहे.
बोकारोच्या बेरमो परिसरातील खेतकोमध्ये सकाळी मोहरमची मिरवणूक निघाली. ताजिया घेऊन जात असताना विजेच्या तारेला स्पर्श झाला. त्या तारेतून ११००० वोल्टचा वीज प्रवाह जात होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ताजिया उचलताच त्याचा स्पर्श हायटेंशन वायरला झाला. त्यामुळे ताजियामधील बॅटरीचा स्फोट झाला.ताजियाचा संपर्क विजेच्या तारेशी येताच १३ जण गंभीररित्या भाजले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला. तर अन्य ९ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना डीव्हीसी बोकारो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयातून वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यानं जखमींच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला. प्रथमोपचारानंतर जखमींना बोकारोला पाठवण्यात आलं.