अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०८ ऑगस्ट २०२३ :-विद्यार्थिनीच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलं आहे. आझमगढमधील चिल्ड्रन्स गर्ल्स कॉलेजमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला. मुलीवर आधी अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा तिच्या कुटुंबियांनी केला. विद्यार्थिनीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. कॉलेजमध्ये विद्यार्थीनाचा बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा दावा मुलीच्या वडिलांनी केला. चिल्ड्रन्स गर्ल्स कॉलेजच्या प्राचार्य आणि शिक्षकांच्या अटकेची मागणी होत आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. आता या प्रकरणाला नवं वळण मिळताना दिसत आहे. कॉलेजमध्ये मृत मुलीच्या शेजारी बसणाऱ्या तिच्या मैत्रिणीनं घटनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘३१ जुलैला तिचा मृत्यू झाला. त्या दिवशी ती व्यवस्थित होती. पाचवा तास संपल्यानंतर तिला अचानक बोलावण्यात आलं. ती मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये गेली. सातव्या तासानंतर पूर्ण शाळेत एकच गोंधळ आणि आरडाओरडा सुरू झाला. त्यामुळे नेमकं काय झालं तेच आम्हाला समजलं नाही,’ असा घटनाक्रम मृत मुलीच्या मैत्रिणीनं कथन केला.’काही मुली माकडांच्या भीतीनं काही विद्यार्थिनींवर पडल्याचा अंदाज होता.
त्यानंतर कॉलेजला अचानक सुट्टी देण्यात आली. नेहमी दुपारी अडीचच्या सुमारास शाळा सुटते. पण त्या दिवशी शाळा दोनच्या सुमारास सुटली. सगळ्या मुली शाळेबाहेर पडल्या,’ असं मृत मुलीच्या मैत्रिणीनं सांगितलं. मृत मुलगी अभ्यासात हुशार होती. २८ जुलैला तिला पहिल्यांदा प्राचार्यांच्या केबिनमध्ये बोलावण्यात आलं. त्यानंतर ती वर्गात परतली. तेव्हा ती अस्वस्थ होती. माझी प्रतिष्ठा कशी परत मिळणार, असं तिनं वर्गात येऊन शिक्षकांना विचारलं. यानंतर ३१ जुलैला तिला पुन्हा प्राचार्यांच्या केबिनमध्ये बोलावण्यात आलं. हा प्रकार तिला सहन झाला नाही. त्यामुळेच तिनं टोकाचं पाऊल उचललं असावं, असं मृत मुलीची मैत्रीण म्हणाली.मुलीचा तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबद्दल संशय कायम आहे. मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन शाळेचे प्राचार्य आणि मुलीच्या वर्ग शिक्षिकेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्य आणि वर्गशिक्षिका त्रास देत असल्याची तक्रार मुलगी घरी आल्यावर करायची, असा दावा मुलीच्या वडिलांनी केला. शाळेत मानसिक त्रास होतो. ही शाळा शिक्षण घेण्याच्या योग्यतेची नाही, असं ती वारंवार सांगायची, असाही दावा वडिलांनी केला.
(AKOLA NEWS NETWORK)