Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीआजच्या गुगल डुडलमधील चष्म्यातून डोकावणारी 'ती' महिला कोण? कोणासाठी आहे आजचे खास...

आजच्या गुगल डुडलमधील चष्म्यातून डोकावणारी ‘ती’ महिला कोण? कोणासाठी आहे आजचे खास डुडल

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ० ४ऑगस्ट २०२३ :-जगातील सर्वात मोठं इंटरनेट सर्च इंजिन गुगल डुडल इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यासाठी खास डुडलची निर्मिती करत असते. त्याचप्रमाणे आजचेही डुडल खासच आहे.आजच्या डुडलमध्ये एक स्टायलिश चष्मा दिसत असून या चष्म्याच्या काचेतून एक महिला डोकावताना दिसते आहे. ही महिला कोण आहे, आणि गुगलने आपलं डूडल तिला का समर्पित केलं आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

गुगलच्या डूडलमधील ही महिला म्हणजे, अल्टीना शिनासी आहे. अमेरिकी कलाकार, डिझायनर आणि इन्व्हेंटर असणाऱ्या अल्टीना यांची आज ११४ वी जयंती आहे. ४ ऑगस्ट १९०७ साली न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी डिझाईन केलेल्या ‘हार्लेक्विन’ चष्म्याच्या फ्रेममुळे त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्या पेंटिंग शिकण्यासाठी पॅरिसला गेल्या. इथूनच त्यांचा कलाविश्वातील आणि डिझायनिंगचा प्रवास सुरू झाला. साल्व्हाडोर डाली आणि जॉर्ज ग्रॉज अशा कित्येक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं आहे. कला आणि डिझायनिंग क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान राहिलं. १९ ऑगस्ट १९९९ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

सध्या ‘कॅट-आय’ फ्रेम नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या डिझाईनची आयडिया अल्टीना यांना इटलीमध्ये सुचली. इटलीच्या व्हेनिस शहरात होणाऱ्या कार्निव्हलमध्ये हार्लेक्विन मास्क वापरण्यात येतात. या मास्कवरुन प्रेरणा घेत अल्टीना यांनी हार्लेक्विन फ्रेमचा पहिला प्रोटोटाईप बनवला. त्यांनी बनवलेला पहिला प्रोटोटाईप हा कागदी होता. सुरुवातीला त्यांच्या या डिझाईननुसार चष्म्याची फ्रेम बनवण्यासाठी कोणीही दुकानदार तयार होत नव्हता. अखेर, एका दुकानदाराने त्यांना संधी दिली, आणि ही फ्रेम तयार झाली.हार्लेक्विन चष्मा येण्यापूर्वी महिलांसाठी अधिक फ्रेम ऑप्शन्स उपलब्ध नव्हते. स्टायलिश डिझाईनमुळे अल्पावधीतच ही फ्रेम भरपूर लोकप्रिय झाली. १९३० आणि ४० च्या दशकात ही फ्रेम जगभरात गाजली. याच फ्रेमला पुढे कॅट-आय फ्रेम म्हणून ओळख मिळाली. आजही चष्मा घेताना कोट्यवधी महिला अशा फ्रेमला पसंती देतात.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!