अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ४ सप्टेंबर २०२३ :- जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केला. या आंदोलनाचे नेतृत्व केले होते मनोज जरांगे -पाटील यांनी. हे मनोज कोण आहेत याची उत्सुकता राज्यातील नेते, कार्यकर्ते यांच्यासह सामान्यांना आहे. त्यामुळेच गुगल सर्च वर अनेकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण फारसा उपयोग झाला नाही. पण या मनोज जरांगे यांची माहिती आता हाती आली आहे.
आठ वर्षांपूर्वी मराठा आरक्षणासाठी राज्यभर विविध जिल्ह्यात मूक मोर्चे सकल मराठा समाजाने काढले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मोर्चेकऱ्यांना विविध आश्वासने दिली. पण त्यातील अनेक आश्वासने, निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकले नाहीत. त्यामुळे हे आंदोलन काही काल शांत झाले असे वाटत असताना गाव खेड्यात आरक्षणाबाबत मराठा तरुण आक्रमक होते. अशी आंदोलने तालुका, जिल्हा स्तरावर होत होती. असेच एक आंदोलन जालनामध्ये मनोज जरांगे -पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते.पण शुक्रवारी सरकारने पोलिसी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. यात अनेक आंदोलक जखमी झाले आणि सरकार विरोधात रोष निर्माण झाला.
जालना जिल्ह्यातून सुरू झालेल्या या आंदोलनातील मुख्य नेते असणारे मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील. गेवराई तालुक्यातील माथोरी हे त्यांचे मूळ गाव. शहागड ही त्यांची सासुरवाडी. गेल्या १२ -१५ वर्षापासून ते शहागडमध्ये राहतात. माथोरी गावातील हा अल्पभूधारक शेतकरी. मराठा आंदोलने सुरू झाली तेव्हापासून छोट्या- मोठ्या आंदोलनात सहभागी होणारे, प्रसंगी पुढारपण करता आले तर एखादे भाषण करणाऱ्या मनोज जरांगे -पाटील कोण आंदोलनानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटतील, असे त्यांनाही कदाचित वाटले नव्हते.
२०१५ पासून गावागावात आंदोलन करण्यासाठी १२ पर्यंत शिकलेल्या जरांगे यांनी विविध आंदोलने केली. अगदी गेल्या काही महिन्यात अनेक गावात उपोषण केले. त्या- त्या गावातील लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी होते. असे असताना अंतरवाली सराटी येथे त्यांनी केलेल्या आंदोलानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. आणि मनोज जरांगे हे नाव सध्या भलतेच लोकप्रिय झाले आहे.