पहाटे वडिलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झल्यानंतर सकाळी रस्ता अपघातात मुलगा ठार झाल्याची घटना सिरसो फाट्याजवळ शनिवारी घडली. एकाच दिवसात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. दुचाकीवर प्रवास करीत असलेल्या मुलाचा टिपरने धडक दिल्याने मृत्यू झाला.
मूर्तिजापूर तालुक्यातील रेपाडखेड येथील रहिवासी सिद्धार्थ जामनिक (वय ४० वर्ष) यांचे वडिल जानरावजी जामनिक यांना उपचारार्थ मूर्तिजापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा पहाटे ४ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. पुढील सोपस्कार करण्याकरीता सिद्धार्थ जामनिक हे एम.एच.३०-व्हि-३८७८ या दुचाकीने रेपाडखेडकडे निघाले. सुमारे ६ वाजताच्या दरम्यान सिरसो फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येत असलेल्या टिपर (एम.एच.२७–बी.एक्स. ०१९३ ) जोरदार धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचे समोरील चाक पूर्णपणे तुटले होते. सिद्धार्थ जामनिक यांच्या पाय आणि डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची गंभीर अवस्था पाहता त्यांना तत्काळ अकोला येथे हलवण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दोन लहान मुलं असून, ते कुटुंबाचे आधार होते. दरम्यान या अपघात प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत.