ANN अकोला नेटवर्क ब्युरो दि. 11 जुन :- शहरातील प्लास्टिकच्या गोदामाला शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदामातील प्लास्टीक, ऑईल पेंट आणि इतर साहित्य भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
खामगाव शहरातील जीन माता मंदिर परिसरात अनिल बोधाराम गणवाणी नामक व्यापाऱ्याचे प्लास्टिक तसेच इतर ऑईल पेंटचे गोदाम आहे. या गोदामाला शनिवारी सायंकाळी अचानक आग लागली. उकाड्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले.
या घटनेची माहिती मिळताच, खामगाव एका आणि शेगाव अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, आगीचे स्वरूप मोठे असल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला मोठे प्रयत्न करावे लागले. आग लागलेल्या ठिकाणाजवळच लोकवस्ती असल्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत, आपापल्यापरीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
तर घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळ गाठले. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याची चर्चा आहे.