अकोला न्युज नेटवर्क दिनांक २७ फेब्रुवारी २०२४,बोर्डी :- ज्याचा भाव शुद्ध देव त्याला दूर नाही, भक्तांनी फक्त पापाला भ्यावं आयुष्यात ज्याने भाव जपला त्याने धर्म जपला; तसेच पैसा तेवढाच मिळवावा जेवढा धर्माने मिळतो मग भावाची शुद्धी असली की प्रभूकृपा होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले मनी नाही भाव अन देवा मला पाव, देव अशा न पावायचं नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे.. असे कथा प्रवचन हभप समाधान महाराज शर्मा यांनी श्री गजानन महाराज संस्थान सजल विहीर शांतीवन अमृततिर्थ अकोली अकोलखेड येथे प्रगट दिन महोत्सवातील श्रीमद् भागवत कथेचे दुसरे पुष्प गुंफताना केले. समाधान महाराज पुढे बोलताना म्हणाले मनुष्य जन्मातील चार पुरुषार्थ धर्म,अर्थ,काम, मोक्ष हे आहेत दिशा देखील चारच आहेत तसंच माणसाचा शेवटचा प्रवासही चारच जणांच्या खांद्यावर असतो तेव्हा आयुष्यातला धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा पुरुषार्थ प्रत्येकाने पाळावा. यावेळी पुढे कथेतील वराह अवतार कपिल भगवान अवतार कर्दम ऋषींची कथा आदींचे कथा प्रवचन केले कथेची दुसऱ्या पुष्पाची सांगता मुख्य यजमान कैलास चंद्र अग्रवाल कुमुदिनी अग्रवाल दैनंदिन यजमान गजानन धर्मे, सौ ज्योती गजानन धर्मे तसेच दैनंदिन अन्नदाते यांच्या हस्ते श्रींची,भागवत कथेची व संत ज्ञानेश्वरांची आरती करून करण्यात आला. दुसऱ्या पुष्पाचे संचालन मिलिंद झाडे यांनी केले.
20 हजार स्क्वेअर फुटाचा भव्य कथा मंडप
श्रींच्या प्रकट दिन उत्सवासाठी दररोज विविध ठिकाणाहून श्रींचे भक्त सजल विहीर येथे दर्शनासाठी गर्दी करत आहेत. तसेच समाधान महाराज यांच्या भागवत कथा ऐकण्यासाठी भक्तांच्या सुविधेत सुमारे 20 हजार स्क्वेअर फुटाचा भव्य कथा मंडप टाकण्यात आला आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशी हा कथा मंडप भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्याचे दिसून आले.