Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीउत्तराखंडमध्ये जनजीवन विस्कळीत, अनेक रस्ते बंद; केंद्र सरकारकडून ४१३ कोटी रुपयांची मदत

उत्तराखंडमध्ये जनजीवन विस्कळीत, अनेक रस्ते बंद; केंद्र सरकारकडून ४१३ कोटी रुपयांची मदत

उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणात अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. गत चार दिवसांत देशातील वेगवेगळ्या राज्यांत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.हवामान खात्याने सांगितले की, पुढील दोन दिवस उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. संततधार पावसामुळे दरड कोसळल्याने राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाले आहेत, त्यामुळे जनजीवनासह चार धाम यात्रेवरही परिणाम होत आहे. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग चमोली ते जोशीमठ दरम्यान पाच ठिकाणी भूस्खलन आणि ढिगारा कोसळल्याने बंद करण्यात आला आहे. चमोलीचे अतिरिक्त जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र नेगी यांनी सांगितले की, प्रशासनाने बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंना गौचर, कर्णप्रयाग आणि नंदप्रयाग येथे सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे.

राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरसू आणि कल्याणी येथे दरड कोसळल्याने यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे, तर पकोडनाला आणि धाराली दरम्यान ढिगाऱ्यांमुळे गंगोत्री महामार्गही बंद आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन डेब्रिज हटवून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न करत आहे. सिरोबगडमध्ये दरड कोसळल्याने रुद्रप्रयाग महामार्गही बंद आहे. आपत्ती निवारण्यासाठी उत्तराखंड राज्याला केंद्र सरकारकडून ४१३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.

यमुना नदीला ऐतिहासिक पूर, ४५ वर्षांचा विक्रम इतिहासजमा दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीने आज २०७.७१ मीटरची पातळी गाठून ४५ वर्षे जुना विक्रम इतिहासजमा केला. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि हरयाणात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे हरयाणातील हथिनी कुंड धरणातून वेगाने सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बऱ्यापैकी कोरड्या असलेल्या राजधानी दिल्लीत ऐतिहासिक पुराचे संकट ओढवले.

हिमाचलमध्ये २००० पर्यटकांची सुटका हिमाचलच्या कासोलमध्ये अडकलेल्या किमान २,००० पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. हिमाचलमध्ये शिमला-किन्नौर मार्गावर एक वाहन सतलज नदीत पडून एकाच कुटुंबातील चार सदस्य बेपत्ता झाले आहेत. पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यात घराचे छत कोसळून एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. पंजाबच्या पटियाला, रूपनगर, मोगा, लुधियाना, मोहाली आदी भागांतून १० हजारांवर लोकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पौडी जिल्ह्यात एक कार पूर आलेल्या नदीत कोसळून त्यातील पाचपैकी तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp