अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ :- गेली तीन दशकं काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी काम करणारे, बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.

राज्याच्या राजकारणावर होल्ड असणारा नेता
राज्याच्या राजकारणात होल्ड असणारा नेता म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं. मराठवाड्यातही अशोक चव्हाण यांच्या नावाला वलय आहे. अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशोक चव्हाण हे राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे मराठवाडा आणि विशेषतः नांदेडमध्ये त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. हिंगोली, लातूर आणि अर्थातच नांदेड लोकसभा मतदारसंघातील राजकारणात अशोक चव्हाण यांचा होल्ड आहे.
कोण आहेत अशोक चव्हाण?
अशोक चव्हाण यांच्यावर बालपणापासूनच काँग्रेसी विचारांचा प्रभाव राहिला. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हेदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. त्यामुळे लहानपणापासूनच अशोक चव्हाण यांच्यावर राजकारण आणि समाजकारणाचे संस्कार झाले. पुणे विद्यापीठात शिकत असताना अशोक चव्हाण हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी बनले. विद्यार्थी प्रतिनिधी ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्याचा राजकीय प्रवास राहिला. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.