Thursday, May 16, 2024
Homeकृषीबहुपर्यायी ट्रॅक्टरचलित पाच ओळीचे बीबीएफ यंत्र

बहुपर्यायी ट्रॅक्टरचलित पाच ओळीचे बीबीएफ यंत्र

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २१ जुलै :- सद्यस्थितीत हवामान बदलामुळे पावसाचे आगमन, वितरण तसेच निर्गमन यामध्ये बराच बदल आढळुन येत आहे. याचा परिणाम कोरडवाहू शेतीवर मागील काही वर्षात दिसुन येत आहे. महाराष्ट्रात एकुण मशागती खालील सुमारे ८० टक्के क्षेत्र कोरडवाहू शेतीमध्ये येते. यासाठी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त मुलस्थानी जलसंधारण करुन त्याचा पावसाच्या खंड काळात उपयोग करणे जसे आवश्यक आहे तसे अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाय योजना करणे ही आवश्यक आहे. अशा वेळी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण व तिव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन विविध पिकांची लागवड रुंद वरंबा सरी पध्दतीने (बीबीएफ पध्दत) केल्यास फायदेशीर ठरते. कोरडवाहू शेतीसाठी उपयोगी तंत्रज्ञानामध्ये रुंद वरंबा सरी पध्दत एक अत्यंत उपयोगी व हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान ठरले आहे. तसेच तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवणपूर्व तणनाशकांचा वापर करणे फायदेशीर ठरते.

त्याकरीता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी केंद्रीय कृषि कोरडवाहू संशोधन केंद्र हैद्राबाद यांचे चार फणी रुंद सरी बरंबा (बीबीएफ) पेरणी यंत्रामध्ये सुधारणा करुन पाच फणी रुंद सरी वरंबा (बीबीएफ) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी (४ इन १) यंत्र विकसीत केले. ट्रॅक्टरनी थ्री पॉइंट लींकेजला पेरणी यंत्र लावून पेरणी करत असताना पीटीओ रिकामा असतो, त्याचा वापर करुन फवारणी संच पेरणीसह सुलभतेने वापरता येते अी संरचना करण्यात आली आहे. ट्रॅक्टरचलित पाच फणी (बीबीएफ) पेरणी यंत्र (४ इन १) द्वारे खालील प्रमाणे थोडा बदल करीत व कमी रुंदीचे टायर लावून, तीन टप्यात सोयाबीन व इतर पीकामध्ये पेरणी ते फवारणी पर्यंतची संपुर्ण कामे यांत्रिक पध्दतीने करता येते.

१. बीबीएफ पध्दतीने पेरणी, रासणी, फवारणी, उगवण पूर्व (तणनाशक)
पारंपारीक पध्दतीमध्ये शेतकरी बी, खत, पेरणी, तणनाशक फवारणी व रासणी तसेच कीटकनाशक फवारणीचे कामे ट्रॅक्टर अथवा बैलचलित यंत्राच्या सहाय्याने करतात व त्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ३० ते ३२ तास लागतात व मजूरावरील व यंत्राचा खर्च जास्त होतो त्या दृष्टीने ट्रॅक्टरचलित एकाच फ्रेमवर पाच ओळीचे बीबीएफ (रुंद वरंबा व सरी) पेरणी, रासणी व फवारणी यंत्र विकसीत करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रुंद वरंब्यावर पेरणी करणे, खत देणे, रासणी करणे व तणनाशक फवारणी करणे हे चारही कामे एकाच वेळी करता येतात त्यामुळे होणारा खर्च कमी होतो व वेळेची बचत होते तसेच शेतात ट्रॅक्टर एकाच वेळी गेल्याने मातीवर दाब कमी पडतो.
यामध्ये असलेल्या सरी यंत्रामुळे (रिजर्समुळे) योग्य प्रकारे वाफे तयार होऊन त्यावर शास्त्रीय पध्दतीने पेरणी होऊन तणनाशक फवारणीमुळे तणाचा प्रदुर्भाव अत्यंत कमी होतो तसेच वाफ्याची निर्मीती होऊन जर पावसाचे पाणी अधिक पडले ते वाफ्याद्वारे वाहून जाते व कमी पाऊस झाला तर असलेला ओलावा टिकुन ठेवण्यास मदत होते व पाणी सऱ्यांमध्ये मुरते, त्यामुळे मुलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकांस लाभ होतो.
विशेषतः पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो व त्याची तीव्रता कमी होते. गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. त्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होती व पिकाची पुढील वाढ जोमदारपणे होते. या यंत्राने चार कामे एकाच वेळेस होत असल्याने ट्रॅक्टर सतत शेतामध्ये जाण्यामुळे होणारे माती दबण्याचे प्रमाण कमीत कमी होईल तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये मोठा प्रमाणत बचत होणार आहे.

२. ट्रॅक्टरचलित कोळपणी व सरी यंत्र कमी रुंदीच्या टायर सह

४ इन १ यंत्राचे पेरणीचा डबा काढून याच यंत्राद्वारे एकाच वेळी कोळपणी गरज असेल तर फवारणी, तसेच सऱ्या मोकळा करणे असे कामे करता येतात. त्याकरीता ट्रॅक्टरला कमी रुंदीचे टायर बसवणे गरजेचे आहे.

३. ट्रॅक्टरचलित फवारणी
ट्रॅक्टर खरेदी करताना टायर मोठे व रुंद असतात व ते रान तयार करण्याच्या किंवा जास्त ताकदीच्या/शक्ती लागणाऱ्या कामाकरीता कामात येतात. परंतु ज्यावेळी पेरणी किंवा मुख्यत्वे कोळपणी, फवारणी असे कामे करताना जर मोठे टायर वापरले तर पिकाचे नुकसान होते व रान देखील जास्त दबल्या जाते त्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. हे नुकसान टाळण्यासाठी मग शेतकरी, ट्रॅक्टर असुनही, कोळपणी फवारणीचे काम मजूर लावून करतात. त्या कामासाठी मग जास्त खर्च होते व एकंदरीत अर्थिक गणित बिघडते.


कोळपणी व फवारणी सारखे कामे वेळेवर होणे अत्यंत गरजेचे असते आणि नेमके त्याच वेळेस मजूरांचा तुटवडा होतो, पावसाचे दिवस असतात वातावरणामुळे पिकांवर विविध रोग पडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत सर्व कामे वेळेत करण्याची लगबग सुरु असते पण काम पूर्ण होणे शक्य होत नाही किंवा काम आटोक्यात येत नाही.
वरील प्रमाणे सर्व बाबी टाळणे करीता आपल्याकडे जे ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरला कमी रुंदीचे टायर बसविणे गरजेचे आहे. ज्यामुळे कोळपणी, फवारणी ही कामे यांत्रिक पध्दतीने वेळेवर वा वेळेच्या आत आटोपता येतात. कमी रुंदीची टायर खरेदी करताना ट्रॅक्टरला बसेल असेच टायर रीमसह खरेदी करावे.
सदरील टायर बसून कोळपणी व फवारणी सारखे कामे ट्रॅक्टरद्वारे सहज करता येतात व पिकाचे व जमिन दबल्याने होणारे नुकसान देखील टाळता येवू शकते. तसेच ट्रॅक्टरचा शेती कामाकरीता होणारा वार्षिक वापर पण वाढवता येवू शकतो. सदरील कामे एकाच वेळी केल्यामुळे होणारा एकुण खर्च कमी होऊन एकुण उत्पादन खर्च कमी करता येतो. त्यामुळे एकंदर खर्चात व वेळेत बचत होते.


या यंत्राद्वारे कीटकनाशक तसेच उगवणीपूर्व व नंतर तणनाशक फवारणी करता येते. फवारणी करतेवेळी पेरणी यंत्र बाजूला काढून ठेवता येते व पाहिजे ते कीटकनाशक फवारणी करता येते. या यंत्राने एक सारखी फवारणी करता येते. फवारणी यंत्राच्या ६ मीटर बुम वर १२ नोझल असून ते पिकातील दोन ओळीतील अंतरानुसार कमी अधिक अंतरावर बसविता येतात. या यंत्राच्या सहाय्याने तासाला १ हे. क्षेत्र फवारणी होते.

प्रमुख फायदे :
फणातील अंतर बदलणे शक्य
वाफे पध्दतीचा वापर
पेरणीसह रासणी व तणनाशक फवारणी
खर्चात व वेळेत ३०-४० % बचत
कार्यक्षमता १.५ एकर प्रति तास
गादी तयार करणे, खत व बी पेरणीसह रासणी व फवारणी एकाच वेळेस केल्यामुळे शेतातील माती दाबण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे माती मोकळी राहण्यास मदत होते.
उत्पन्नात २० – ३०: वाढ
बी व खतामध्ये १५-२० % बचत
तण काढणे व खर्चात २० % बचत
कोळपणी, फवारणी व सऱ्या मोकळा करण्याचे दुसऱ्या टप्यातील काम एकाच वेळेत करता येतात.
फक्त फवारणी करीता सुद्धा वापरता येते (६ मी. बुम)

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!