अकोला न्युज नेटवर्क ब्युरो डेक्स दि.६ सप्टेंबर २०२३ अनुराग अभंग अकोला :- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणी साठी संविधानिक मार्गाने चालू असलेल्या आंदोलन कर्त्यावर पोलिसांनी घेराव घालून अमानुषपणे लाठी चार्ज केला. यामध्ये महिला, पुरुष व लहान मुले जखमी झाले आहेत या अमानुषपणे केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्याकरिता दिनांक 5-9-2023 रोजी मराठा सेवा संघ कार्यालय अकोला येथे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा अकोला च्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आली होती.
या सभेमध्ये सर्वानुमते दि.8-9-2023 रोजी शांततेच्या मार्गाने अकोला बंद चा निर्णय घेण्यात आला व त्याप्रमाणे आज दि.6-9-2023 रोजी प्रभारी जिल्हाधिकारी , अकोला माननीय बी. वैष्णवी व पोलीस अधीक्षक अकोला माननीय श्री संदीप घुगे यांना अकोला बंद ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आले व प्रशासनाकडून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. या बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.
बंद मध्ये यांचा राहणार सहभाग
या बंदसाठी अकोला जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष, सर्व जाती-धर्माच्या संघटना, व्यापारी संघटना, शाळा महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक संघटना, किराणा बाजार असोसिएशन, व्यापारी आडतीया संघटना, सराफा व्यावसायिक, ग्रेन मर्चंट असोसिएशन, पेट्रोल पंप असोसिएशन, हॉटेल व्यावसायिक असोसिएशन, अकोला बार असोसिएशन, आय.एम.ए.अकोला, बांधकाम व्यावसायिक संघटना, इंजिनिअर अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन इत्यादी सर्व संघटना यांनी या बंद ला पाठींबा जाहीर करून सहकार्य करण्याचे मान्य केले असून सर्व स्तरातून अकोला बंद करण्याकरिता मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे.