आलेगाव- येथील एका महिलेने तीन दिवसांपूर्वी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आल्यानुसार या महिलेच्या मुलाचे गावातील काही लोकांनी धर्मांतर घडवून आणण्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवार 15 जुलै रोजी आलेगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी सकाळपासून आलेगाव कडकडीत बंद आहे.
आलेगावातील एका 19 वर्षीय युवकाचे चार लोकांनी जबरदस्ती धर्मांतरण घडवून आणल्याची तक्रार मुलाच्या आईने चान्नी पोलिसांमध्ये तीन दिवसांपूर्वी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून चारही आरोपींना अटक केली. धर्मांतरण झाल्याचा आरोप असलेल्या युवकाची सुद्धा पोलिसांनी कसून चौकशी केली. या प्रकरणाचे पडसाद जिल्हा सह संपूर्ण राज्यात उमटायला लागल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सुद्धा स्वतः आलेगावात येऊन या प्रकरणाची पडताळणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कसून चौकशी करण्याचे आदेश दिले. प्रारंभी या प्रकरणात वेळ काढू पणाची भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी आता मात्र प्रकरण गांभीर्याने घेऊन कसून चौकशी सुरू केलेली आहे. दरम्यान या प्रकरणाच्या निषेधार्थ गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे बंद पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी शांततेत बंद पाळण्यात आला. या स्वयंस्फूर्त बंदला आलेगावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शनिवारी सकाळपासून आलेगावातील दुकाने, बाजारपेठ बंद आहेत. खाजगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. काही शाळा सुरू आहेत मात्र या शाळेत पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवले नाही. हा बंद सकाळपासून अगदी शांततेत सुरू आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.