Saturday, April 13, 2024
Homeताज्या घडामोडीबहनों और भाइयों.. रेडिओच्या जगातील आवाजाचा जादूगार हरपला; अमीन सयानी यांचे निधन

बहनों और भाइयों.. रेडिओच्या जगातील आवाजाचा जादूगार हरपला; अमीन सयानी यांचे निधन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २१ फेब्रुवारी २०२४:- देशातील ज्येष्ठ रेडिओ होस्ट अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले, तेथे सायंकाळी 7 वाजता त्यांचा मृत्यू झाला. सयानी 1952 ते 1994 दरम्यान गीतमाला रेडिओ शोचे होस्ट होते. यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

अमीन सयानी हे प्रदीर्घ काळापासून आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. त्यांना मागील 12 वर्षांपासून पाठदुखीचा त्रास होता आणि त्यामुळेच त्यांना चालण्यासाठी वॉकरचा वापर करावा लागत होता. ज्यांना रेडिओचे जग माहित आहे, त्यांना अमीन सयानी कोण होते हे देखील माहित आहे. ‘बिनाका गीतमाला’च्या या उद्घोषकाला रेडिओचे श्रोते अजूनही विसरलेले नाहीत. ते अतिशय उत्साही आणि सुरेल पद्धतीने ‘बहनों और भाइयो’ म्हणायचे. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला, त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या आवाजाचे चाहते दुःखी झाले आहेत.

20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी निधन
अमीन सयानी यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अमीन सयानी यांचा मुलगा राजील सयानी याने वडिलांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, मंगळवारी (20 फेब्रुवारी) त्यांच्या वडिलांना दक्षिण मुंबईतील त्यांच्या घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तरी उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रेडिओ सिलोन आणि विविध भारती चॅनलवरील ‘बिनाका गीतमाला’ या त्यांच्या कार्यक्रमाने तेव्हाचे लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढल होते. प्रत्येक आठवड्याला रेडिओप्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आसुसले असायचे. अमीन सयानी यांनी जवळपा १९ हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये झाली होती.

रेडिओवर १९५२ साली सुरु झालेल्या ‘गीतमाला’ या कार्यक्रमाने अमीन सयानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी होती की, रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास ६५ हजार पत्रं यायची. या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त ७ गाणी होती. ही संख्या नंतर १६ पर्यंत वाढवण्यात आली. त्यावेळी अमीन सयानी दिवसाला १२ तास काम करायचे. त्या दिवसांची आठवण सांगताना अमीन सयानी यांच्या मुलाने सांगितले की, रविवार सोडून मला वडील कधीच भेटायचे नाहीत. ते त्यांच्या स्टुडिओमध्ये कामात असायचे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!