अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ :-महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल पार पडलं आहे. आज राज्यातील मविआच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. मविआच्या बैठकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या बैठकीपूर्वी एक बातमी समोर आली आहे. ते म्हणजे शरद पवार (ANN NEWS) गटातील बडा नेता येत्या काही दिवसांमध्ये अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे, अशी बातमी सूत्रांच्या हवाल्यानं एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिली आहे. त्यामुळं येत्या काळात नेमका कोणता नेता शरद पवारांची साथ सोडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यात २ जुलै रोजी राजकीय भूकंप झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,आदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील अजित पवार यांच्या गटात गेलेले आहेत. अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून संधी देण्यात आलेली आहे. वित्त खातं देखील अजित पवार यांच्या गटाकडे आहे. त्यामुळं बदलत्या (ANN NEWS) राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील काही नेते देखील आगामी काळात अजित पवारांच्या गटात जाणार अशा चर्चा सुरु आहेत.महाविकास आघाडीच्या काळात महत्त्वाची जबाबदारी पार पडलेला नेता अजित पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे, अशी बातमी एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. अजित पवार गटातील दिग्गज नेत्यांची संख्या पाहता शरद पवार गटात राहून एकाकी लढावं लागेल,अशी त्या नेत्याची भावना झाली असल्याचं बोललं जातंय.
इंडियाची बैठक अन् राष्ट्रवादीतील पडझड रोखणे, पवारांपुढं आव्हान
देशातील २६ राजकीय पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावर आहे. हे सुरु असताना राष्ट्रवादीतील होणारी पडझड थांबवण्याचं आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे.