ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक 28 जुन 2023 बुधवार :- अकोला येथेच उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या निलेश अपार यांची काही महिन्यांपूर्वीच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी उपविभागात बदली झाली होती अकोल्यात थोडी थोडी लाच घेण्याची सवय लागलेल्या अपार यांनी अखेर मोठया प्रमाणावर लाच घेतली असून अखेर तब्बल 40 लाख रुपयांची लाच प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेच आहेत
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक लाचखोरांवर एसीबीने कारवाई केली असून आता आणखी एक मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला आहे. दिंडोरी उपविभागीय अधिकारी (प्रांत) निलेश अपार हा तब्बल ४० लाखांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या हाती लागल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दिंडोरीचा उपविभागीय अधिकारी निलेश अपार हा एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे.
एका खाजगी कंपनीची जागा अकृषक (एनए) करुन देण्यासाठी अपार याने तब्बल ४० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर याबाबत एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला. आणि अपार हा ४० लाखांची लाच घेताना सापडला आहे. याप्रकरणी एसीबीच्या पथकाकडून अपार याची चौकशी सुरू असून दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीच्या या मोठ्या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत. शिवाय महसूल यंत्रणाही अतिशय सतर्क झाली आहे. आतापर्यंत शिक्षण, पोलिस अशा विविध विभागात सापळे यशस्वी होत होते. आता महसूल विभागातही लाचखोरी बोकाळल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याप्रकरणी एसीबीकडून लवकरच मोठी माहिती सादर केली जाणार आहे.
(थोड्याच वेळात सविस्तर वृत्त. ते वाचण्यासाठी हेच पेज रिफ्रेश करावे)