अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २३ जानेवारी २०२४:- श्रीरामाचे सोमवारी अयोध्या नगरीत आगमन झाले.तो बहुप्रतीक्षित अभिषेक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. वेदमंत्रांच्या घोषात सोमवारी दुपारी १२.५० वाजताच्या मुहूर्तावर हा सोहळा संपन्न झाला. या ५१ इंच उंचीच्या सजवलेल्या सावळ्या राममूर्तीचे दर्शन होताच जगभर रामनामाचा जयघोष सुरू झाला. प्रभू रामचंद्रांचे ‘याचि देहि याचि डोळा’ दर्शन घेण्यासाठी भक्तांचा महासागर उसळला आहे. मंगळवारपासून भव्य सर्वसामान्य भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
दरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहातील अभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभिषेक विधी संपन्न होत असताना मुख्य पुरोहितांसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यापूर्वी तंबूत असलेल्या जुन्या राममूर्तीची प्रथम पूजा झाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास नवीन मूर्तीवरील अभिषेक विधी प्रत्यक्ष सुरू झाला. नंतरच्या ८४ सेकंदांनंतर मध्यान्हीच्या अभिजीत मुहुर्तावर रामलल्ला आपल्या दिव्य आणि भव्य मंदिरात विराजमान झाले. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशभरातील ५० पारंपरिक वाद्यांचा समावेश मंगलध्वनी म्हणून करण्यात आला होता. संगीत नाटक अकादमीतर्फे हा वाद्यवृंद संयोजित करण्यात आला होता. पखवाज, बासरी, वीणा, ढोलकी, पंग, काली, शहनाई आदी वाद्यांचा त्यात समावेश होता.