Saturday, September 14, 2024
Homeताज्या घडामोडीसमृद्धी'वर अपघात टाळण्यासाठी महामृत्यूंजय मंत्राचा जप; गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंदू जनजागृती समितीची...

समृद्धी’वर अपघात टाळण्यासाठी महामृत्यूंजय मंत्राचा जप; गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंदू जनजागृती समितीची मोठी मागणी

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २९ जुलै २०२३:-समृद्धी महामार्ग सुरु झाल्या मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे; मात्र समाजहित लक्षात घेता हे अपघात होऊ नयेत, यासाठी दिंडोरी (नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ संप्रदायाच्या वतीने सव्वा कोटी महामृत्यूंजय मंत्रजप करण्यात आला. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार ‘जादूटोणा विरोधी कायद्या’च्या आधारे बुलढाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

सद्हेतूने समाजहितासाठी केलेल्या धार्मिक कृतीला गुन्हा ठरवणे, हा सरळसरळ जादूटोणा कायद्याचा दुरूपयोग आहे. हा कायदा अंधश्रद्धांचे नव्हे, तर हिंदूंच्या धर्मश्रद्धांचे निर्मूलन करणारा आहे, यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरून या कायद्याच्या विरोधात शेकडो आंदोलने केली होती.उद्या जर कोणी विश्वकल्याणार्थ यज्ञयाग केला, तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘अंनिस’कडून केली जाईल आणि असे गुन्हे दाखल करून धार्मिक कृत्यांवर गंडांतर आणले जाईल. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक कृत्यांवर गदा आणणारा आणि श्रद्धेवर आघात करणारा हा काळा कायदाच रद्द करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी केली. यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही श्री. घनवट यांनी म्हटले.

घनवट पुढे म्हणाले की, जादूटोणाविरोधी कायदा हा हिंदु धर्माच्या विरोधातच आहे. जर हा कायदा केवळ फसवणूक, आर्थिक लुबाडणूक वा अत्याचाराच्या विरोधात आहे; तर समृद्धी महामार्गावरील अपघात रोखावेत, जनतेचा जीव वाचावा, या सद्हेतुने स्वत:च्या खर्चाने कोणी प्रार्थना, पूजा, मंत्रजप आदी करत असेल, तर त्यात गैर काय आहे ? यात कोणता अपराध आहे ? यातून कुठे कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली ? याचे उत्तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आणि त्यांच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनी हिंदु समाजाला द्यायला हवे !

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp