अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २८ जुलै २०२३:–लोणी ते मंचर (ता. आंबेगाव ) रस्त्यावर निरगुडसर फाटा नजदिक हांडेवस्ती जवळ सिमेंट ट्रक सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मंचर कडून लोणी कडे जात असताना पलटी झाला. या अपघातात ट्रक ड्रायव्हर व इतर दोनजण जखमी झाले आहेत.
लोणी ते मंचर रस्त्यावर निरगुडसर फाटा व हांडे वस्ती नजदिक रस्त्याचे सिमेंटकॉक्रिटचे काम चालू आहे. निरगुडसर फाटा नजदिक काम पूर्ण झाले आहे. पण हांडे वस्तीजवळ रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटचे काम संथ गतीने चालू आहे. शिवाय एकाच बाजूचा रस्ता पूर्ण झाल्याने मोठ्या वाहनांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर सध्यातरी वाहतूकीची मोठी समस्या आहे. या रस्त्यावर आज एक सिमेंट मिक्सर टँकर पलटी झाला होता. तसेच रात्री एक चार चाकी वाहनही रस्त्याच्या बाजूला साईड पट्ट्या व्यवस्थित भरल्या नसल्याने खाली गेली होती. त्यावेळेस स्थानिक तरुणांनी ती चार चाकी गाडी उचलून व्यवस्थित रस्त्यावर आणली. त्यानंतर आज दिनांक २८ रोजी पुन्हा सकाळी मंचर वरून सिमेंट गोणी भरून लोणी या ठिकाणी चाललेल्या ट्रक पलटी झाला आहे.
या अपघातात ट्रकचालक सुखदेव भेके (वय ५२), संदिप इंदोरे (वय ३८), गणपत पारधी (सर्व रा. मंचर ता. आंबेगाव) हे जखमी झाले आहेत. लोणी, पाबळ वरून मंचरला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने लहान मोठ्या वाहनाची मोठी वर्दळ असते. तरी सार्वजानिक बांधकाम विभाग व सबंधित ठेकेदार याने रस्त्याचे उर्वरीत काम त्वरीत चालू करावे, रस्त्याच्या साईटच्या साईट पट्ट्या व्यवस्थित भरून घ्याव्यात अशी मागणी पोलीस पाटील विठ्ठल वळसे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष युवराज हांडे यासह ग्रामस्थ व वाहन चालकांनी केली आहे. दरम्यान रस्त्याची दुरुस्ती लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.