अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-एका व्यक्तीने तब्बल 14 वर्षं मुलीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तब्बल 14 वर्षं तिला आपल्या घरात लैंगिक उपभोग घेण्यासाठी डांबून ठेवलं होतं.रशियातील चेल्याबिन्स्क येथे ही घटना घडली असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने 14 वर्षांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं. आता ही मुलगी 33 वर्षांची झाली आहे. 2009 पासून आरोपीने पीडितेला आपल्या घरात डांबून ठेवलं होतं. यादरम्यान, त्याने तब्बल 1000 वेळा तिचं लैंगिक शोषण केलं.न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, व्लादिमीर चेस्कीडोव्ह असं या आरोपीचं नाव आहे. दरम्यान याच घरात त्याने 2011 मध्ये एका महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. बंदिस्त असणाऱ्या महिलेने पळ काढत पोलिसांची गाठ घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीच्या आईनेच पीडितेला पळून जाण्यात मदत केली.
पीडितेने पोलिसांसमोर सगळा घटनाक्रम उलगडला असून, काही हादरवणारे खुलासे केले आहेत. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बेडरुमच्या बाहेर कोणतीही कामं करण्यासाठी जाताना तिला चाकूच्या धाकावर नेलं जात होतं. तसंच अनेक छोट्या मुद्द्यांवरुन तिला अमानुषपणे मारहाण करत छळ केला जात होता.पीडितेने तक्रार केल्यानंतर पोलीस आरोपी व्लादिमीरच्या घरी दाखल झाले होते. पोलिसांनी स्मोलिनो गावात असणाऱ्या त्याच्या एकमजली घराची झडती घेतली. यावेळी त्यांना तिथे अश्लील खेळणी आणि सीडीचा संग्रह सापडला. रशियन तपास समितीच्या स्थानिक शाखेला घराच्या बेसमेंटमध्ये मानवी अवशेष सापडले आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनाही हादरवणारा आहे.रशियाने टुडेने तपास अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी आणि पीडितेची 2009 मध्ये भेट झाली होती. पीडिता तेव्हा 19 वर्षांची होती. आरोपीने पीडितेला मद्यपान करण्यासाठी घरी बोलावलं होतं आणि तेव्हापासून त्याने तिला बंदिस्त करुन घरात ठेवलं होतं.
आरोपीची मानसिकरित्या आजारी असून, त्याची प्रकृती अजून खराब होत आहे. त्यामुळे त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं होतं. हीच संधी साधत पीडितेने घऱातून पळ काढला होता.पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आणखी एका मुलीला घरात आणलं होतं. 2011 मध्ये त्याने वाद झाला असता तिची हत्या केली होती. त्याने एकामागोमाग अनेकदा तिच्यावर चाकूने वार करत हत्या केली अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली.पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर हत्या, बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला वेड्यांच्या इस्पितळात दाखल केलं आहे. पोलीस त्याच्यावर करडी नजर ठेवून आहेत. दरम्यान, घटना उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.