अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ० ४ऑगस्ट २०२३ :-राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान, तसेच कडधान्य व खाद्यतेल अभियान (गळितधान्य) योजनेतील विविध लाभांसाठी शेतकरी उत्पादक कंपनी, गट व वैयक्तिक शेतकरी यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
या अभियानात बीज प्रकिया संच, गोदाम सुविधा, बीजप्रक्रिया यंत्र, घरगुती साठवणूक कोठी, टोकन यंत्र, छोटे तेलघाणी यंत्र आदी विविध साधनांसाठी अनुदान दिले जाते.
बीज प्रक्रिया संच
राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्य योजनेत शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीजप्रक्रिया प्रकल्पाचा लाभ घेता येतो. उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणारे शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीज प्रकिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी यंत्रसामुग्री, तसेच बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 10 लक्ष रू. पर्यंत अनुदान मिळते. त्यासाठी शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीला बँकेकडे कर्जासाठी प्रकल्प प्रस्ताव द्यावा लागतो. बँकेने कर्ज मंजूर केल्यावर ते अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी पात्र होतात.
गोदाम सुविधा
अन्नधान्य उत्पादनाच्या सुधारित साठवणुकीसाठी व मूल्यवृद्धीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. योजनेत 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लक्ष 50 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान मिळते. इच्छूक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार पात्र ठरेल.बीज प्रक्रिया संच व गोदाम सुविधेसाठी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. जिल्ह्यासाठी प्राप्त लक्ष्यांकापेक्षा अधिक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीचे अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीच्या मान्यतेने सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होते.
मनुष्यचलित बीजप्रक्रिया यंत्र
शेतकरी वैयक्तिक वापरासाठी बीज प्रक्रिया यंत्र खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे गटामार्फत बीजप्रक्रिया यंत्र अनुदानावर देण्यात येते. या मनुष्यचलित यंत्राच्या खरेदीसाठी किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 8 हजार रू. अनुदान मिळते. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी गटांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
घरगुती साठवणूक कोठी
कडधान्य व पौष्टिक तृणधान्य पीकांसाठी साठवणूक सुविधेची गरज असते. त्यामुळे घरगुती साठवणूक कोठी अनुदानावर मिळते. एका लाभार्थ्याला पाच क्विंटल मर्यादेपर्यंत साठवणूक कोठी दिली जाते. त्यासाठी किमतीच्या 50 टक्के किंवा 2 हजार रू. मर्यादेत अनुदान मिळते.
मनुष्यचलित टोकन यंत्र
गळितधान्य पीकाच्या पेरणीत सुलभता आणण्यासाठी व बियाण्याची बचत करण्याच्या हेतूने मनुष्यचलित टोकन यंत्र व मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रील याचाही अभियानात समावेश आहे. यासाठी अनुदान गटामार्फत किंवा वैयक्तिकही मिळते. मनुष्यचलित टोकन यंत्र खरेदीसाठी 10 हजार रू. प्रतियंत्र व मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रील खरेदीसाठी 5 हजार रू. प्रतियंत्र किंवा किमतीच्या 50 टक्के यात जे कमी असेल त्यानुसार अनुदान मिळते. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो.