अकोला न्युज नेटवर्क दिनांक २२ जुलै :- पावसाळा सुरू झाला की खवय्ये चवदार, देशी मक्याच्या कणसांची आतुरतेने वाट बघत असतात. भर पावसात गरम भाजलेली कणसं खाण्याचा आनंदच काही औरच असतो. त्यामुळे अनेकांची पावले सध्या मक्याचे कणसं खाण्यासाठी चौक, चौपाटया, उद्यानं, मुख्य रस्त्यांवर लागलेल्या हॉकर्सच्या गाड्यांकडे वळत आहेत. घरीही विविध पदार्थ बनविण्यासाठी मक्याचे बाजारात खरेदी होत असल्याने स्वीट व देशी अशा दोन्ही मक्याच्या कणसांना मागणी वाढली आहे. सध्या भाजलेल्या किंवा उकडलेल्या मक्याच्या कणसांना लिंबू, लोणी, चीज, चाटची लज्जत देखील दिली जात आहे. ते बघता कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहात नाही. चीज मका ६०, बटर मका ५०, उकडलेला मका ५०, उकडलेल्या मक्याची चाट ६० आणि साधा भाजलेला लिंबू, चाट मसाला लावलेला मका २५ रुपयांना विकला जात आहे.
पिझ्झा, बर्गर अथवा अन्य फास्टफूड खाण्यापेक्षा तरुणाई मक्याचे कणसं खाण्यास पसंती देत आहे. त्यामुळे व्यावसायिकांना हंगामी व्यवसायाचे साधन उपलब्ध झाले आहे. आम्हाला तीन महिने रोजगार उपलब्ध होतो, असे कणीस विक्रेता विकास राजू थोरात यांनी सांगितले.
पोषक तत्त्वांचा खजिना
मक्याचे कणीस हे पोषक तत्त्वांनी भरलेले असते. १०० ग्रॅम मक्याच्या कणसात भरपूर पोषक तत्त्व आढळतात. यात ऊर्जा ९६ टक्के, पाणी : ७३ टक्के, प्रथिने ३.४ ग्रॅम, कार्बोदके २१ ग्रॅम, शर्करा ४.५ ग्रॅम, तंतुमय पदार्थ २.४ ग्रॅम व फॅट्स १.५ ग्रॅम असते.
५० रुपयांचा ४ नग
मागील वर्षी कणसाचे पोते हे ३०० ते ३५० रुपयांना मिळत होते. यंदा त्या मध्ये १०० रुपयांनी वाढ झाली आहे. यंदा हिरव्या मक्याचे पोते ४०० ते ४५० रुपयाला मिळत असले तरीही मागणी वाढली आहे. एका पोत्यात ५० ते ५५ कणीस मग येतात.
कणसं खाण्याचे अनेक फायदे
मक्याचे कणसं खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात लोह आढळून येते. त्यामुळे शरीरातील लोहाची उणीव भरून निघते. लोह प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. यात असलेल्या लोहामुळे अशक्तपणाच्या तक्रारींपासून आराम मिळू शकतो. हे शिजवल्यानंतर यातील अँटिऑक्सिडंटचे प्रमाण वाढते. हे हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. कणसातील तंतुमय पदार्थांमुळे पाचन संस्था आणि कोलेस्ट्रॉल प्रमाणही नियंत्रित राहते. –