अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २९ जुलै २०२३:-तुम्ही अनेकदा ऐकलं असेल किंवा त्याच्या बातम्याही पाहिल्या असतील की, ऊसतोड करताना वाघाचे, बिबट्याचे बछडे सापडले. किंवा एखाद्या ठिकाणी जंगल सफारी करताना वाघाचे बछडे सापडले तर ते तुम्हाला पाळता येतात का रस्त्यावर सापडलेलं एखादं कुत्र्याचं पिल्लू आपल्याला सापडलं तर ते आपण घरात घेऊन येतो. तसं वाघाच्या बछड्यांना सांभाळता येत का, यासाठी काय नियमावली आहे असे प्रश्नही तुमच्या मनात उपस्थित राहीले असतील.
भारतात काय आहे प्राण्यांच्याबाबतीतला नियम
पहिल्यांदा आपण भारताबाबत जाणून घेऊया. भारतामध्ये कोणत्याही धोकादायक प्रजातीच्या प्राण्यांना पाळता येत नाही. या धोकादायक प्राण्यांच्या प्रजातीमध्ये सिंह, वाघ किंवा चित्ता यांचाही समावेश आहे.वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ॲक्ट (वन्यजीव संरक्षण कायदा) अंतर्गत या प्राण्यांना खासगी पद्धतीने पाळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. जर कोणालाही त्यांचा वापर इतर कामांसाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर मंजुरी घ्यावी लागेल.एखाद्या व्यक्तीला धोकादायक प्रजातींचे प्राणी पाळायचे असतील, तर त्यासाठी राज्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डनकडून मान्यता घ्यावी लागेल. तुम्हाला त्या प्राण्याची प्रत्येक गरज भागवावी लागेल. याशिवाय संपूर्ण सुरक्षेची व्यवस्थाही करावी लागेल.
तुम्हाला वाघ पाळायचा असेल तर हे करावं लागेल
भारतात जरी वाघ पाळायला परवानगी नसली तरीही तुम्हाला वाघ पाळायची इच्छा पूर्ण करायची असेल तर परदेशात स्थायिक व्हावे लागेल. तसं बघायला गेलं तर आता अनेक देशांनी धोकादायक प्राणी पाळण्यावर बंदी घातली आहे. हे केवळ थायलंड आणि आफ्रिकेतील काही देशांमध्येच शक्य आहे.खरंतर 2015 साली मध्य प्रदेश सरकारमधील तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री कुसुम मेहदेल यांनी वाघांची संख्या वाढवणे कायदेशीर असावे, अशी मागणी केली, तेव्हा त्यांनी थायलंड आणि आफ्रिकेचे उदाहरणही दिले होते.
भारतात वाघांची संख्या किती आहे?
जगातील एकूण वाघांपैकी 70 टक्के वाघ हे भारतात आहेत. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये वाघांची संख्या 20 हजार ते 40 हजार इतकी होती. मात्र, त्यानंतरच्या काळात शिकार व अन्य कारणांमुळे वाघांची संख्या सातत्याने घटत गेली.सध्याच्या घडीला भारतामध्ये केवळ 2,967 वाघ शिल्लक आहेत. त्यामुळे वाघाची प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये व्याघ्र संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जाताना दिसत आहेत. देशातील 18 राज्यांमधील 47 व्याघ्र संवर्धन प्रकल्पांमध्ये वाघांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले जातात.