अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १४ सप्टेंबर २०२३ :-राज्यातील प्रत्येक घराघरात लाडका राजा गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे… प्रत्येक जण त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये अनेक छोटी मोठी मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. या मंडळाचीही मोठी लगबग सुरु आहे. मात्र, या सर्व मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. याच गणेशोत्सव मंडळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला.
गणेशोत्सवाची चाहूल लागताच अनेक लहान छोटी मंडळे आपापल्या तयारीला सुरवात करतात. सजावट, मूर्तीची उंची, मंडप अशा सगळ्याच बाबींची तयारी मंडळांना कारवाई लागते. मात्र, त्यासाठी पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. देखाव्यामधून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही अशी हमी गणेशोत्सव मंडळांना लिखित स्वरुपात द्यावी लागते.
गत दहा वर्षात पोलीस आणि प्रशासन यांचे सर्व नियम आणि कायद्यांचे पालन ज्या गणेशोत्सव मंडळांनी केले आहे. जय मंडळाच्या कोणत्याही तक्रारी प्राप्त नाहीत अशा उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांना आगामी वर्षांसाठी आणखी उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी देण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या संदर्भात गणेशोत्सव मंडळांनी मागणी केली होती. अखेर, मुख्यमंत्री शिंदे यांनी हा निर्णय घेत गणेशोत्सव मंडळांना दिलासा दिला आहे. या बैठकीमध्ये एका याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांकडेही लक्ष वेधण्यात आले. याबाबत नगर विकास विभागाने शासन निर्णयही जाहीर केला आहे.
यावर्षीच्या १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात शासन नियमांचे आणि कायद्यांचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी हा निर्णय लागू असेल. गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता परवानगी देण्याची कार्यवाही सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायती यांनी करावी लागणार आहे.
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या मालकीच्या जागेवर गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जागा देतांना नाममात्र शंभर रुपये भाडे घेता येईल. तर, उत्सवासाठी यापूर्वी वेळोवेळी विहित केलेले शासन निर्णय, आदेश, अटी, शर्ती याचे पालन मंडळांना करावे लागणार आहे. तसेच, मंडळांना स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून ऑनलाईन माध्यमातून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे.