ANN & GTPL न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 10 जुलै – कपाशी हे पीक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जर महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ, खानदेश या पट्ट्यात कपाशीचे पीक सगळ्यात जास्त घेतले जाते. आपल्याला माहित आहेच की, इतर पिकांप्रमाणेच कपाशी पिकांवर देखिले वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
यामध्ये कपाशीवरील रोगांपैकी कपाशीची पाने लाल पडणे अर्थात लाल्या रोग हा मोठ्या प्रमाणावर कपाशीच्या पिकाचे नुकसान करतो. या रोगाचे वेळेत नियंत्रण केले नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. लाल्या रोगाचा विचार केला तर गेल्या दहा ते बारा वर्षापासून जास्त प्रमाणात कपाशीवर दिसून येतो. या लेखात आपण लाल्या रोग का येतो? व त्यावरील उपाय जाणून घेणार आहोत.
कपाशीवरील लाल्या रोगाची कारणे
1- जर आपण जमिनीत जास्त अन्नद्रव्य लागत असलेल्या पिकांची लागवड केली असेल, उदाहरणार्थ ऊस, केळी इत्यादी पिकांची लागवड शेतात असेल
व त्या नंतर त्या जागेवर कपाशीची लागवड केली तर कपाशीला आवश्यक असलेले आवश्यक अन्नद्रव्य कपाशी पिकाला मिळत नाही ,हे एक प्रमुख आणि महत्वाचे कारण या रोगामागे आहे.
2- पिकांची फेरपालट करणे फार महत्त्वाचे असते. आपल्याकडे बरेच शेतकरी पीक फेरपालट करत नसल्यामुळे आदल्या वर्षी कपाशीची लागवड केलेल्या क्षेत्रातच पुन्हा कपाशीची लागवड केली तरी ही समस्या उद्भवते.
3- कपाशी लागवड करताना ती अतिशय हलक्या जमिनीत किंवा मुरमाड असलेल्या जमिनीत केली तरी सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
4- बऱ्याचदा पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यामुळे जमिनीत जास्त पाणी साचून राहिले व अशा पाण्याचा निचरा व्यवस्थित आणि पटकन झाला नाही तर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
याउलट, पावसामुळे पाण्याचा ताण पडला तर त्याचा परिणाम जमिनीतील नत्र, मॅग्नेशियम सारखी आवश्यक मुलद्रवे कपाशीच्या झाडाला हव्या त्या प्रमाणात शोषता येऊ शकत नाही. हेदेखील एक महत्त्वाचे कारण या रोगामध्ये आहे.
5- जेव्हा कपाशीची बोंडांवस्था असते, तेव्हा कपाशीच्या पिकाला जास्त प्रमाणात नत्राची गरज असते. नेमक्या याच वेळी जर नत्राचे प्रमाण कमी झाले तर कपाशीची पाने लाल होतात.
6- बीटी जनुक असलेल्या कपाशीच्या जाती मध्ये बोंड आळीला प्रतिबंध करण्याचा गुणधर्म असल्यामुळे झाडावर जास्त बोंडे टिकून राहतात व साहजिकच जास्त बोर्डांना परिणामी जास्त नत्राची गरज भासते.
अशा वेळी जमिनीतून लागणाऱ्या आवश्यक त्या नत्राचा पुरवठा न झाल्याने बोंडाना लागणाऱ्या नत्राची गरज ही कपाशीच्या पानाच्या माध्यमातून भागविली जाते. त्यामुळे पानांमध्ये नत्राचे प्रमाण कमी होऊन कपाशीचे पाने लाल पडू लागतात.
7- तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला म्हणजे तुडतुडे किडी चा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास कपाशीचे पान सुरुवातीला कडेने लाल पडून नंतर संपूर्ण पान लालसर दिसते.
लाल्या रोगावरील नियंत्रणाचे उपाय
1- कपाशीची लागवड करताना जमिनीची निवड जेव्हा कराल तेव्हा ती अतिशय हलक्या जमिनीत कपाशीची लागवड करणे टाळावे.
2- ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही अशा जमिनीमध्ये कपाशी पीक घेणे टाळावे. जरी घेतले तरी पाणी साचले तर ते पटकन शेताच्या बाहेर निघेल अशी व्यवस्था करावी. उदाहरणार्थ-चर काढणे
3- शिफारस केल्याप्रमाणे कपाशीच्या पिकाला खतांच्या योग्य मात्रा वेळेत द्यावेत. कोरडवाहू क्षेत्रासाठी नत्राची मात्रा दोन वेळा विभागून द्यावी आणि बागायतीसाठी तीन वेळा नत्राची मात्रा विभागून देणे अतिशय महत्त्वाचे असते.
4- तसेच कपाशीच्या निरनिराळ्या अवस्था जसे की बोंडे भरणे, पाते लागणे यासारख्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये दोन ते तीन वेळेस दोन टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी.
5- एवढ्या प्रमाणात काळजी घेतल्यावर जर लाल्या रोगाची लक्षणे कपाशीवर दिसू लागल्यास 40 ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून
शिफारसीनुसार दोन ते तीन फवारण्या कराव्यात अथवा जमिनीतून 20 ते 30 किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे.
6- कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रसशोषक किटकांचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यांच्या नियंत्रणासाठी फिफ्रोनिल 20 मिली किंवा 10 मिली इमिडाक्लोप्रिड किंवा 20 मिली बुप्रोफेझिन (25 एस सी) प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.