अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०८ ऑगस्ट २०२३ :-भारत सरकारने १९७२ मध्येच वाघ हा राष्ट्रीय प्राणी आणि मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे.त्यामुळे गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही,असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सोमवारी संसदेत सांगितले.गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्यासंदर्भातला मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे खासदार भागीरथ चौधरी यांनी उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी अलाहाबाद हायकोर्टाच्या एका टिप्पणीचा संदर्भ दिला. अलाहाबाद आणि जयपूर उच्च न्यायालयाने गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेत वेग आणण्याचा आदेश दिला होता आणि यासंदर्भात टिप्पणी केली होती. यासंदर्भात काही पावले उचलली जात आहेत का, असा प्रश्न खासदार चौधरी यांनी संसदेत उपस्थित केला.
त्यावर मंत्री जी किशन रेड्डी यांनी उत्तर दिले की.वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्याचा सरकारचा विचार नाही.भारत सरकारने वाघाला राष्ट्रीय प्राणी मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे.त्यांना वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाच्या अनुसूची – १९७२ मध्ये समाविष्ट केले आहे.केंद्र सरकार वन,पर्यावरण आणि वातावरण बदलाच्या अधिकृत नोंदीत बदल करत नाही.त्याचप्रमाणे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाने गोवंश आणि त्यांचा विकास,संरक्षणासाठी ‘राष्ट्रीय गोकुल मिशन’ सुरू केले आहे.त्यामुळे गोवंशासह देशी जातींमध्ये वाढ होत आहे.विभागाने गाय आणि वासरांसहित जनावरांच्या सुरक्षेसाठी भारतीय पशू कल्याण बोर्डाचीही स्थापना केली असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री रेड्डी यांनी यावेळी सांगितले.(AKOLA NEWS NETWORK )