अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०८ ऑक्टोंबर २०२३ : अनेक वर्षे चर्चेत असलेली आणखी एक नोट आजपासून (8 ऑक्टोबर 2023) चलनातून बाद झाली आहे. त्यामुळे नोटाबंदीनंतर चलनातून बाद करण्यात आलेली ही तिसरी नोट आहे. यापूर्वी एक हजार रुपये आणि 500 रुपयांची नोट व्यवहारातून बाद करण्यात आली होती. त्यात या एका नोटेची भर पडली आहे.
रिझर्व्ह बँकेने पूर्वसूचना देऊनही ज्यांनी या नोटा बदलल्या नाहीत त्यांच्याकडील या नोटांचे मूल्य आता शून्य झाले आहे. या नोटा परत घेण्याची मुदत कालपर्यंत (7 ऑक्टोबर 2023) होती. त्यामुळे आता या नोटा तुमच्याकडे असतील तो फक्त एक कागद असेल, त्याला पैशाचे मूल्य नसेल, ही बाब लक्षात घ्या!
2 हजार रुपयांची गुलाबी नोट 30 सप्टेंबर 2023 पर्यंत स्वीकारली जाणार होती म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून चलनातून बाद करण्यात येणार होती. पण 14 लाख कोटींच्या नोटा जमा न झाल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुदतवाढ दिली होती.
2 हजार रुपयांच्या नोटा परत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 7 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे या नोटा कालपर्यंत (7 ऑक्टोबर) चलनात होत्या. आता मुदतवाढ संपल्याने 2 हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत.
30 सप्टेंबरपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या मुदतीत 3.42 लाख कोटींच्या 2 हजारांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्या होत्या. म्हणजेच 96 टक्के नोटा सरकारकडे परत आल्या आहेत. याचाच अर्थ चार टक्के म्हणजेच 14 लाख कोटींच्या नोटा चलनात होत्या.
त्या नोटा परत येण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ दिली होती. 19 मे रोजी रिझर्व्ह बँकेने 2 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा 3.56 लाख कोटी मूल्याच्या 2 हजारांच्या नोटा चलनात होत्या.