अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ११ फेब्रुवारी २०२४:- जिल्हा स्त्री रूग्णालयातील ओपीडीच्या नूतनीकरणामुळे महिला रूग्णांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. याठिकाणी आवश्यक इतर सुविधांसाठीही तत्काळ निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.
रूग्णालयातचसुमारे १ कोटी ७८ लक्ष ६८ हजार रू. निधीतून नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण यांच्या हस्ते आज झाले. आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, वैद्यकीय सेवा परिपूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. सर्वसामान्यांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजना अमलात आणली असून, राज्यातही महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू आहे. जिल्हा स्त्री रूग्णालयात संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण चांगले आहे. राज्यात आदर्श रूग्णालय उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. रूग्णालयाला आवश्यक सोनोग्राफी मशिन आदी सुविधांसाठी तत्काळ निधी मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार श्री. सावरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. आधुनिकीकरणात रॅम्प, स्वच्छतागृह, विद्युतीकरण, पाणीपुरवठा अशा विविध कामांचा समावेश आहे.