अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २० जुलै :- सातपुड्याच्या पायथ्याशी १९ जुलैच्या पहाटे आलेल्या मुसळधार पावसाने शहानूर गावकऱ्यांची तारांबळ उडाली. नाल्याचे पाणी गावातील सखल भागात शिरल्याने झोपडपट्टी परिसरातील काही भाग पाण्याखाली गेला होता. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून, सकाळी ११ वाजेपर्यंत पुराचे पाणी ओसरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
अकोट तालुक्यातील सर्वच मंडळात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहानूर येथे लोकवस्तीच्या पूर्वेकडे पहाडी भाग असून, त्यावरून वाहणारे पावसाचे हे पाणी रस्त्यावरून नागरी वस्तीकडे वाहत गेले, आणि रस्त्यालगत असलेल्या काही घरांमध्ये आणि जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरले.
तसेच धारूर- रामापूर ग्रामपंचायतीमध्ये येत असलेल्या या गावात ग्रामपंचायतीने लोकवस्तीमध्ये बांधकाम केलेली मोठी नाली आहे. या नालीत पाइप ब्लॉक झाल्याने काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरून कालांतराने ओसरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, प्रशासनाकडून या भागात भेट देण्यात आली असून, पाहणीत कुठलीही जिवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. तलाठी यांच्या प्राथमिक अहवालात पावसामुळे डोंगरावरील पाणी नाल्यात शिरल्यानंतर नाल्यात कचरा साचलेला असल्याने गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे अहवालात नमूद केले आहे.