अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ : शीर्षक वाचून गजानन महाराजांचे भक्त गोंधळून जाणे वा त्यांच्या भावना दुखावल्या जाणे स्वाभाविक आहे. मात्र, काल रात्री उशिरापर्यंत हुबेहूब वेशभूषा करणाऱ्या या कथित महाराजामुळे खामगाव मध्ये चांगलाच गोंधळ उडाला.
खामगाव येथील सुटाळपुरा परिसरात अशोक सातव यांच्या घरात कथित गजानन महाराज अचानक ‘प्रगटले’! त्याने, ‘मला तुमच्या घरी जेवण करायचं’ असे फर्मान सोडले. घरातील बयाबापड्यांनी लगेच जेवणाची व्यवस्था केली. याची माहिती परिसरासह शहरात पसरली आणि समाज माध्यमामुळे वादळाच्या वेगाने पसरली.
परिणामी, सातव यांच्या घराभोवती रात्रीच श्रद्धाळू भक्तांचा (!) दर्शनासाठी तोबा गर्दी उसळली. शेवटी पोलिसांनाही पाचारण करावे लागलं. या ठिकाणी भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास एक व्यक्ती सुटाळपुरा परिसरातील अशोक सातव यांच्या घरासमोर गजानन महाराजांची वेशभूषा करून अचानक आली.
मला तुमच्या घरी जेवण करायचं असे सातव यांच्या घरातील महिलांना या व्यक्तीने म्हटले. या व्यक्तीने गजानन महाराज यांच्यासारखी वेशभूषा केली कुटुंबीयांनी ही त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर ही व्यक्ती गजानन महाराजच आहे अशी माहिती परिसरात पसरली. समाज माध्यमात क्षणात काही फोटो , व्हिडिओ व्हायरल झाले. या ठिकाणी बघ्याची व भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती.
रात्रभर परिसरात भक्तांची गर्दी
संत गजानन महाराजांचा जयघोष करत शेकडो लोक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत होती. मात्र ही व्यक्ती कोण आहे? कुठून आली..? याबाबत अद्यापही कुणाला माहिती नाही. रात्रभर या परिसरात अशीच भक्तांची गर्दी दिसून आली. सकाळी मात्र याच परिसरात राहणाऱ्या धनंजय वाजपे नावाच्या पत्रकारांनी या व्यक्तीला शेगाव रेल्वे स्थानक परिसरात सोडून दिल्याची माहिती स्वतः वाजपे यांनी एका खाजगी वृत्त्वहिनीला दिली आहे. त्यानंतर या बाबतीत शेगाव रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटिव्ही तपासून बघितले असता कुठेही गजानन महाराजसारखी दिसणारी व्यक्ती मात्र नंतर आढळून आली नाही.
विदर्भाची पंढरी म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव प्रसिद्ध आहे. श्रीसंत गजानन महाराज हे 145 वर्षापूर्वी संतनगरी शेगाव येथे प्रकट झाले होते. त्याठिकाणी त्यांनी आपले जीवन शेगाव वासियांच्या सहवासात घालविले. दरम्यान त्यांनी मोठा भाविक वर्ग निर्माण केला होता आणि येथेच ते समाधिस्त झाले. राज्यभरातून हजारो भाविक येथे वर्षभर येत असतात.