अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २८ जुलै २०२३:-मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दर्यापूर रोडवर एका कंटेनर मधून तब्बल ३० पेक्षा अधिक गुरांची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी नाकाबंदी करीत ट्रक ताब्यात घेतला. या ट्रक मधील तब्बल गुरांना जीवनदान देण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी केली.
मूर्तिजापूर ते अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर रोडवर टीएस २० टी ६९०२ क्रमांकाच्या आयशर ट्रकमधून गुरांची कत्तलीसाठी कोंबून वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी दर्यापूर रोडवर पहाटेपासूनच नाकाबंदी केली. शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास हा ट्रक या परिसरात आल्यानंतर पोलिसांनी ट्रक थांबवून झाडाझडती घेतली असता यामध्ये तब्बल ३० पेक्षा अधिक गुरांना निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे उघडकीस आले. ट्रकचा चालक व क्लीनर यांची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन ट्रकची झडती घेतली. गुरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी मुर्तीजापुर पोलीस ग्रामीण ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून गुरांची सुटका केली आहे. या गुरांना गौरक्षण संस्थेत ठेवण्यात आले आहे.