अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १२ फेब्रुवारी २०२४:- राज्यात गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. रोज काही ना काही गुन्ह्यांच्या, कधी मनाचा थरकाप उडेल अशा घटना कानावर येत असतात. पोलिसांची गस्त, कडेकोट बंदोबस्त, असूनही अनेक ठिकाणी सर्रास गुन्हे घडताना दिसतात. त्याची झळ मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसते. मात्र काही वेळा या गुन्ह्यांमुळे लोकांच्या संतापाचा उद्रेक होतो आणि तेच गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी सज्ज होतात. अशीच एक घटना बुलढाण्याजवळ घडली आहे.
तेथे सामान्य नागिराकांनी एका इसमाला चांगलंच बुकलून काढलं. महिला, मुलींशी अश्लील वर्तन करून छेडछाड करणाऱ्या, त्यांना त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला महिलांनी बेदम चोप दिला. एवढंच नव्हे तर त्याला चोप देऊन त्याच्या गळ्यात चपलेचा हार टाकल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर कुकडे असे आरोपीचे नाव असून तो बुलढाण्याच्या शेगाव शहरातील आहे. कुकडे याचे शहरात गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कूल असून त्या ठिकाणी येणाऱ्या महिला मुलींशी तो अश्लील वर्तन करायचा. त्यांची छेडही काढायचा. अनेकींना याचा त्रास झाला होता, मात्र भीतीपोटी महिला मुली समोर येत नव्हत्या. अखेर एका पीडित मुलीने हिंमत दाखवली आणि कुकडे याचा पर्दाफाश केला. तिने काही मुलींच्या, महिलांच्या मदतीने कुकडे याचं पितळ उघडं पाडलं आणि त्याला भर रस्त्यात चोप देत बदडून काढलं. एवढंच नव्हे तर त्याच्या गळ्यात चपलेचा हार घालून, त्याची धिंड काढत त्याला पोलीस स्टेशन पर्यंत नेलं. मात्र संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींनी विनंती केल्याने, पोलिसांनी त्याला समज दिली. त्यानंतर कुकडे याने, पुन्हा अशी चुकी करणार नाही, असे लिहून देत माफी मागितल्यानंतर हे प्रकरण तिथेच थंड झालं.