अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २० जुलै :- जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, गत २४ तासात सरासरी ४९ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद बुधवारी करण्यात आली. मूर्तिजापूर, बार्शीटाकळी आणि अकोला या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, प्राथमिक अंदाजानुसार १४ हजार २९२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, ५१५ हेक्टर शेत जमीन खरडून गेली आहे. तसेच घरांचेही नुकसान झाले.
मुसळधार पावसामुळे अंकुरलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मरदेखील पाण्यात बुडाले होते. मोठ्या प्रमाणात विजेचे खांब कोसळल्याने शेत शिवारातील वीज पुरवठा खंडित झाला. बार्शीटाकळी तालुक्यालाही मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. नदीकाठच्या गावांतील जनजीवन विस्कळीत झाले होते.
जिल्ह्यातील पूरस्थितीची माहिती पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन व भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून जाणून घेतली. अकोला -३०.६, तेल्हारा- १०३. ८ , बाळापूर- ४१.८, पातूर- ३५.५ , अकोला- ४८.१, बार्शीटाकळी-५६.७, मूर्तिजापूर- ३५.७, एकूण- ४९.१ (आकडे मिमी.) {मूर्तिजापूर तालुक्यात ८ हजार २९० हे. आर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले व २९२ हे. शेतजमीन खरडून नुकसान झाले. {बार्शीटाकळी तालुक्यात २ हजार ६० क्षेत्रावरील पिकांचे नुकसान व १३० हे. जमीन खरडून निघाली. {अकोला तालुक्यात ३ हजार ९४२ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होऊन ९३ हे. जमीन पूर्णत: खरडली. यानुसार या तीन तालुक्यांतील एकूण १४ हजार २९२ हेक्टर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले व ५१५ हेक्टर शेतजमीन खरडून हानी झाली.