अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ६ एप्रिल :- अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या IPL आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान सुरू असलेल्या अवैध सट्ट्याविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह आणि अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गोपनिय माहितीवरून दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत, १ एप्रिल रोजी पोलिस स्टेशन डाबकीरोड अंतर्गत फुकटपुरा भागात झालेल्या कारवाईत विवेक नंदलाल मुंदडा याच्याकडून मोबाईल, टॅब व नगदी असा ५४,५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यावर सांकेतिक भाषेतून IPL सट्टा खेळत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तपासादरम्यान दिनेश भुतळा, युश राजेश तिवारी (दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील), योगेश ओमप्रकाश अग्रवाल (अमरावती), रविंद्र मोतीराम दामोदार (अकोला), अमोल श्रीधर ठाकरे (बुलढाणा), प्रदीप सुर्यभान सोनटक्के (अकोला) आणि प्रविणसिंग राजपालसिंग चव्हाण (अकोला) हे आणखी सहा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
तर दुसऱ्या घटनेत, ५ एप्रिल रोजी पोलिस स्टेशन बार्शिटाकळी अंतर्गत ग्राम कान्हेरी सरप येथील हॉटेल राजवाडा परिसरात झालेल्या कारवाईत शेख रमजान शेख कालु गौरवे (३४, अकोला) आणि वैभव पांडुरंग फेड (३१, अकोला) यांना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या IPL सामन्यावर मोबाईलवरील लिंकद्वारे क्रिकेट सट्टा खेळताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक जुना मोबाईल, एक मोबाईल सिम आणि इतर साहित्य तसेच नगदी असा एकूण १,१३,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध सुरू असून खऱ्या सुत्रधार कोणीत याचा तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेकडून अकोला जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांबाबत किंवा आयपीएल क्रिकेट सट्ट्याबाबत कुठलीही माहिती असल्यास ती ९९२१०३८१११ किंवा ९१३००९६४४९ या क्रमांकांवर कळवावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह सा. अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पो.उप.नि. गोपाल जाधव, व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार फिरोज खान, भास्कर थोत्रे, खुशाल नेमाडे, रवि खंडारे, अविनाश पाचपोर, आकाश मानकर, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, मो. आमीर यांनी केली आहे.