अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-आतापर्यत एकूण नऊ चित्त्यांचा मृत्यू नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात आले आहे. यातील धात्री (तिब्लिसी) या आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत नऊ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.मादी चित्त्याच्या मृत्यूनंतर कुनो नॅशनल पार्कचे मुख्य वनसंरक्षक असीम श्रीवास्तव यांनी सांगितले की, धात्री नावाच्या मादी चित्त्याचा मृत्यू झाला असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
वारंवार होणा-या मृत्यूबद्दल ते म्हणाले की, कुनो आणि नामिबियाच्या वन्यजीव डॉक्टरांकडून त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यत झालेल्या चित्तांचा जवळजवळ प्रत्येक मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे. मागील चार महिन्यांत पार्कमध्ये नऊ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा बिबट्या आणि तीन पिल्ल्यांचा समावेश आहे. तसेच सध्या पार्कमधील 14 चित्ते निरोगी आहेत. यात 7 नर, 6 मादी आणि 1 मादी शावकचा समावेश आहे.दरम्यान, 1952 पासून देशातून नामशेष झालेल्या चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कुनो येथे चित्त्याची पिल्ले जन्माला आल्यानंतर हा प्रकल्प यशस्वी होताना दिसत होता. मात्र, मागील चार महिन्यांपासून एकामागून एक चित्त्यांचा मृत्यूच्या घटनांमुळे आता हा प्रकल्प अडचणीत येताना दिसत आहे.
17 सप्टेंबर 2022 रोजी एका भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिकरित्या या 8 चित्त्यांना राष्ट्रीय उद्यानात सोडले होते. मात्र या मोहिमेत चित्ते आणून सोडणे हे एवढेच पुरेसे नाही असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. अर्थात सर्व चित्त्यांच्या गळ्यात कॉलर लावलेल्या आहेत आणि या जंगलात सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे लक्षही ठेवले जात असताना चित्त्यांचा मृत्यू होत आहे.