Friday, May 3, 2024
Homeक्राईमधक्कादायक! गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असणाऱ्या तस्करांना अकोल्यात अटक

धक्कादायक! गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असणाऱ्या तस्करांना अकोल्यात अटक

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो डेक्स :- गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा कट रचणाऱ्या गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळ्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असलेल्या एका तरुणाला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोला पोलिसांनी अटक केली आहे. शुभम लोणकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम लोणकर आणि त्याच्या दोन साथीदारांना अवैधरित्या देशी बंदूक बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन देशी पिस्टलसह नऊ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. चौकशीदरम्यान, पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.

16 जानेवारी 2024 रोजी पोलिस उपनिरीक्षक राजेश जवरे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान अकोट ते अकोला रोडवर अकोला नाक्याच्या पुलाखाली केशरी रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर दोघांजवळ बंदूक असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पीएसआय जवरे यांनी कारवाई करीत दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ एक रिकामे मॅक्झिन मिळाले. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मदतीने ही शस्त्र तस्करी करण्यात आल्याची माहिती आहे. यातील एका आरोपीने लॉरेन्स याचा भाऊ अनमोल बिष्णोई याच्यासोबत ऑडीओ कॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे तपासात प्रथमदर्शनी समोर आल्याची माहिती अकोल्याचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली.

पोलिसांनी या आरोपींची आणखी चौकशी केल्यानंतर आरोपींनी विहिरीत टाकलेले दोन देशी कट्टे व नऊ जीवंत राऊंड वीर एकलव्य आपत्कालीन पथकाच्या मदतीने जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अजय तुलाराम देठे (वय 27 वर्ष, रा. धोबीपुरा अकोट), प्रफुल्ल विनायक चव्हाण (वय 25 वर्ष, रा. अडगांव बु., ता. तेल्हारा जि. अकोला) यालाही बेड्या ठोकल्या.

गुन्ह्याच्या तपासात ‘मास्टरमाइंड’ असलेला तिसरा आरोपी शुभम रामेश्वर लोणकर (वय 25 वर्ष, रा. नेवरी ता. अकोट, जि. अकोला ह. मु. भालेकर वस्ती, वारजे, पुणे) याचा शोध पोलिसांनी सुरू केला. याला पोलीसांनी मध्य प्रदेशातील उजैनमध्ये शोधले. मात्र तो पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला भालेकर वस्ती वारजे, पुणे येथुन अटक केली. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. शुभम लोणकर याच्या मोबाईलवरून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉल केल्याचा पुरावा सापडला आहे.

कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार कारागृहात असला तरी त्यानं कॅनडास्थित गोल्डी ब्रारशी संगनमत करुन सिद्धू मुसेवाला याला मारल्याची कबूली दिली आहे.

लॉरेन्स बिश्नोई आहे कोण?

सध्या तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) यानं पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Siddhu Mosewala) हत्येची जबाबदारी घेतली आहे. कॅनडा () स्थित गोल्डी ब्रार याच्याशी संगनमत करून आम्ही मुसेवालाला संपवल्याची कबुली बिश्नोई यानं तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानं देशभरात खळबळ उडाली होती. त्याच्या मृत्यूची जबाबदारी कुख्यात गुंड गोल्डी ब्रारने घेतली होती. परंतु आता त्याच्या मृत्यूमागे तिहाड जेलमधून खलिस्तानी कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. गोल्डी ब्रार आणि तिहाड जेलमध्ये बंद असलेला गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई हे एकमेकांचे निकटवर्तीय असल्यानं शंका वाढल्या होत्या. अशात आता लॉरेन्स बिश्नोई यांनं आम्हीच मुसेवालाला संपवलं असल्यानं शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!