Lok Sabha Elections । आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ८० पेक्षा जास्त वय असणारे आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग अर्थात दिव्यांग नागरिकांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील ८० पेक्षा जास्त वयोगटातील २ लाख ४८ हजार ५२५, तर पुणे जिल्ह्यात ४० टक्क्यांपुढील शारीरिक दिव्यांग ८५ हजार २०० मतदारांना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा शुक्रवारी आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. राज्यातील ८० पेक्षा जास्त वयोगटातील तब्बल २६ लाख ७० हजार, तर शारीरिक विकलांग पाच लाख ९० हजार ३८२ नागरिकांना या सुविधेद्वारे घरातून मतदान करता येणार आहे.
देशपांडे म्हणाले, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पाच दिवसांत जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादीत नाव असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना १२-ड हा अर्ज घरोघरी जाऊन दिला जाणार आहे. तो भरून घेतला जाणार आहे. अर्जात संबंधित नागरिकांना घरातून मतदान करणार किंवा प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार याबाबतची माहिती घेतली जाईल. त्यावर संबंधित जिल्हाधिकारी निर्णय घेतील. या नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यास उर्वरित मतदारांना विशेत: तरुणांना त्यातून प्रोत्साहन मिळेल.
घरातून मतदान करताना निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असतील. मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. यातून या सुविधेची पारदर्शकता जपली जाणार आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी यासाठी सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती, वेब कास्टिंग, संवेदनशील मतदान केंद्रांची निगराणी, आचारसंहितेच्या भंगाच्या तक्रारींबाबत सी-व्हीजील अॅपच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येणार आहे.
Lok Sabha Elections । कसबा पोटनिवडणुकीत घेण्यात आली होती चाचणी
पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रथमच ८० पेक्षा जास्त वयोगट आणि शारीरिक विकलांग मतदारांसाठी घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार ५५० मतदारांनी घरातून मतदान केले. त्यामुळे ही सुविधा देशभरात नेण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले.
Lok Sabha Elections । उमेदवाराची माहिती आता मतदान केंद्रावर
लोकसभा निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे, त्या सर्व उमेदवारांची माहितीचा गोषवारा मतदान केंद्राच्या ठिकाणी दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. त्यात उमेदवारांची संपत्ती, गुन्हे दाखल याची सर्व माहिती मतदान केंद्रावर असेल. हा नवा प्रयोग लोकसभा निवडणुकीत सुरु करण्यात येणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.