अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ :- एका ब्राम्हण कुटुंबातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले भारतातील बहुचर्चित व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांचे जन्मस्थान मुंबई असले तरी वयाच्या १० वर्षांपर्यंत त्यांचे पालनपोषण अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या एका गावी झाले.टिळकांना भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक प्रमुख पात्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी शाळा-कॉलेज मध्ये 1 ऑगस्ट ला लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्त लोकमान्य टिळक भाषणाचे आयोजन केले जाते. त्यांचे अनेक किस्से जगभरात चर्चेत आहेत. टिळकांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या प्रकृतीच्या प्रत्येक क्षणाची नोंद सामान्य माणसापासून ते दिग्गज आणि पत्राकारांपर्यंत सगळ्यांकडून घेतली जात होती. टिळकांनी १ ऑगस्ट १९२० रोजी अखेरचा श्वास सोडला अन् भारतातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. मात्र त्यांचे विचार, आदर्श इतके सखोल भारताच्या कणाकणात रूजले गेले की त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या विचारांच्या रूपाने त्यांचं व्यक्तिमत्व आपल्यात आजही जिवंत आहे.
टिळकांची समाधी आणि जमिनीत पुरलेली पेटी
टिळकांच्या निधनानंतर गिरगाव चौपाटीवर झालेला टिळकांचा अंत्यविधी ही एक ऐतिहासिक घटना होती. अशा पद्धतीने दहनाची परवानगी भारतात प्रथमच देण्यात आली होती आणि आजवर ती अन्य कोणाला मिळालेली नाही. पण ही परवानगी देताना ब्रिटिश सरकारने तेथे स्मारक उभारायचे नाही अशी अट घातली होती. पण डॉ. एम. बी. वेलकर आणि डॉ. साठे यांनी त्या स्थळाची खूण जपून ठेवली होती. ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली ही परवानगी मिळाली नसली तर टिळकांच्या समाधीसाठी प्रयत्न सुरूच होते.
लोकमान्य टिळकांवर का लागला होता देशद्रोहाचा आरोप? 6 वर्ष होते जेलमध्ये
अखेर पुढे मुंबई पालिका भारतीय सभासदांच्या हातात आल्यावर १९२६ मध्ये चौपाटीवर टिळक समाधी बांधण्यास परवानगी देण्यात आली. काकासाहेब खाडिलकरांच्या पुढाकाराने मांडूचे शिल्पकार फडके यांच्या स्वहस्ते टिळकांचा पुतळा तयार केला गेला. १ ऑगस्ट १९३३ रोजी लोकमान्यांच्या या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. योगायोग असा की या दिवशीही तुफान पाऊस पडत होता, तुफान पावसातही श्रद्धांजलीसाठी आलेली गर्दी मात्र तशीच वाढत राहिली.
लोकमान्यांच्या अंत्ययात्रेला महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी दिला होता खांदा…
टिळकांची समाधी जिथे बांधण्यात आली आहे त्या समाधीबद्दल अनेकांना माहित नसलेली गोष्ट म्हणजे, त्यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याखाली ३० फूट आतमध्ये एक हवाबंद पेटी पुरून ठेवण्यात आली आहे. त्यात टिळकांची पगडी, अंगरखा, उपरणे, जोडे, केळकरकृत टिळक चरित्र व गीतारहस्य ठेवण्यात आले आहे. अनेकांना याबाबत माहिती नाही.