Sunday, June 16, 2024
Homeब्रेकिंगपावसाळ्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारी गरजेची महावितरणचे नागरीकांना आवाहन

पावसाळ्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारी गरजेची महावितरणचे नागरीकांना आवाहन

न्युज न्युज नेटवर्क ब्युरो दि.२० जुलै २०२३:- मुसळधार पावसामुळे जवळपास संपूर्ण जिल्हा जलमग्न झाला आहे. काही ठिकाणची वीज यंत्रणा पाण्यात बुडाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे जमीन खरडल्याने विद्युत खांब वाकले असू शकतात. त्यामुळे वाहिन्या तुटण्याची, इन्सुलेटर फुटून विद्युत प्रवाह खांबात किंवा खांबासाठी असलेल्या ताणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत विद्युत अपघात टाळण्यासाठी नागरीकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे आवाहन महावितरण अकोला परिमंडलाच्या वतीने करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे तुटलेल्या फांद्या वीज वहन तारांवर अडकून पडल्या असल्यास त्या स्वत: काढण्याचा प्रयत्न करू नये. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला वा मोडला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नये, तसेच घरात बसवलेल्या मीटरवर पाणी पडत असल्यास किंवा मीटर असलेली भिंत ओली आढल्यास त्वरित महावितरणशी संपर्क साधावा.

पावसाळ्याच्या दिवसात ग्राहकांनी कोणत्याही विद्युत खांबांना, तारांना, वाहिन्यांना व अन्य उपकरणांना स्पर्श करू नये. तसेच विद्युत खांबांना व उपकरणांना जनावरे बांधू नयेत. त्यास दुचाकी टेकवून ठेवू नयेत किंवा विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्विच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीज तारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्विच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही याची दक्षता घ्यावी. विशेषत: टिन पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विद्युत वाहिनीवर आकडा टाकून विद्युतपुरवठा घेण्याचा प्रयत्न करू नये. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना तक्रार दाखल करण्यासाठी २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटर्सचे १९१२, १९१२०, १८००-११२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. याशिवाय महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!