अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०८ ऑगस्ट २०२३ :-शहरातील चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आत चक्क चोरांनी पोलिस क्वॉर्टरमध्येच घरफोडी केली. घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून ३ लाखांचे दागिने चोराने लंपास केल्याची माहिती आहे.माहितीनुसार, पोलिसांनी व्यंकट हरीभाऊ गंधाळे (३९) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. व्यंकट मुख्यालयात कार्यरत असून राजभवन येथे त्यांची तैनाती आहे. गत शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास व्यंकट घराला कुलूप लावून कुटुंबासह बुट्टीबोरी येथे गेले होते.

या दरम्यान अज्ञात आरोपींनी मुख्य दाराचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश करत चोरी केली. त्यानंतर कपाटातून अंदाजे ३ लाख ४ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी करून चोरट्यांनी पळ काढला. व्यंकट यांच्या शेजारी राहणाऱ्या चौधरी यांनी या घटनेची त्यांना माहिती दिली. यानंतर हुडकेश्वर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.(AKOLA NEWS NETWORK )