अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १८ :- शहरातील उमरी ते गुडधी रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाल्याने वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांचे हाल आहे आहेत याचीच दखल घेत शिवसेनेचे ठाकरे गट जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात उमरी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महापालिका क्षेत्रातील डांबरी रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, पावसामुळे रस्त्यांचे दर्जाहीन निर्माणकार्य उघडे पडले आहे. हद्दवाढ क्षेत्रातील उमरी ते गुडधी या डांबरी मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांसह स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा अपघात होतात. सर्वाधिक हाल महिलावर्ग तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचे होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या डांबरी रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असली तरी दुरुस्ती करण्यासाठी संबंधित यंत्रणेने झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र येत असल्याचे पाहून ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून काल शेकडो शिवसैनिकांनी उमरी रोडवर आंदोलन केले. आंदोलनात सहभागी शिवसैनिकांनी रस्त्यावरील खड्यांमध्ये बेशरमची झाडे लावून प्रशासकीय यंत्रणेचा निषेध व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन पीडब्ल्यूडी च्या अभियंत्यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.