अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ३१ जुलै२०२३ :-भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील विश्वचषक सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. शेड्यूलनुसार, दोघांमध्ये 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार होता, मात्र नवरात्रीमुळे त्यात बदल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता हा सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो. तारखेतील बदलाबाबत अलीकडेच सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. स्टेडियमची क्षमता एक लाख असून नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने गुजरातमध्ये अनेक ठिकाणी गरब्याचे कार्यक्रम होतात. अशा परिस्थितीत स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर दिल्या जाणाऱ्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बीसीसीआय आणि आयसीसी लवकरच नवीन तारखेची घोषणा करू शकतात.
रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता एक दिवस आधी 14 ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो. याशिवाय आणखी अनेक सामन्यांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतात. अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले होते की, तीन देशांनी आयसीसीला पत्र लिहून वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली होती. मात्र, सामन्याच्या ठिकाणी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक पाहिल्यास 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत सामने होणार आहेत. यात एकूण 10 संघ प्रवेश करत असून 48 सामने खेळवले जाणार आहेत