Saturday, December 7, 2024
Homeताज्या घडामोडीघर घेताय? मग जाणून घ्या पीएम आवास योजनेत होम लोनवर तुम्हाला कशी...

घर घेताय? मग जाणून घ्या पीएम आवास योजनेत होम लोनवर तुम्हाला कशी मिळेल सब्सिडी

PradhanMantri Awas Yojana: जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल, तर पंतप्रधान आवास योजना (PMAY) तुमचं काम थोडं सोपं करू शकते. यापूर्वी PMAY चा लाभ फक्त गरिबांना मिळत होता. आता गृहकर्जाची रक्कम वाढवून शहरी भागातील गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही पंतप्रधान आवास योजनेच्या कक्षेत आणण्यात आलं आहे.

सुरुवातीच्या तरतुदींनुसार, पंतप्रधान आवास योजनेमधील गृहकर्जाची रक्कम ३ ते ६ लाख रुपयांपर्यंत होती. या रकमेवर आवास योजनेअंतर्गत व्याजावर अनुदान दिलं जात होतं. आता ती वाढवून १८ लाख रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेचा (PMAY) लाभ घेण्यासाठी कोणत्या आवश्यक अटी आहेत ते जाणून घेऊया.

कोण घेऊ शकतं लाभ?

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय २१ ते ५५ वर्षे असलं पाहिजे. तथापि, जर कुटुंब प्रमुख किंवा अर्जदाराचं वय ५० वर्षांपेक्षा जास्त असेल, तर त्याच्या मुख्य कायदेशीर वारसाचा गृहकर्जामध्ये समावेश केला जातो.

किती असावं वेतन?

ईडब्ल्यूएससाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये ३ लाख निश्चित केलं आहे. एलआयजीसाठी वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाख दरम्यान असावं. याशिवाय १२ आणि १८ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले लोक देखील पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊ शकतात.

उत्पन्नाचा पुरावा

पगारदार व्यक्तींसाठी सॅलरी सर्टिफिकेट, फॉर्म १६ किंवा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)
ज्यांचं २.५० लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न आहे आणि ज्यांचा छोटा व्यवसाय आहे अशा लोकांना उत्पन्नाचा दाखला देता येऊ शकतो. वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास उत्पन्नाचा योग्य पुरावा सादर करणं आवश्यक आहे.

किती अनुदान मिळेल?

६.५ टक्के क्रेडिट लिंक्ड सबसिडी फक्त ६ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर उपलब्ध आहे.
वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंत कमावणारे लोक ९ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ४ टक्के व्याजाच्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे, १८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना १२ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याजाच्या अनुदानाचा लाभ घेता येईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp